नगरपरिषदेकडून गुरांचा लिलाव करण्याचा इशारा
*राजापूर | प्रतिनिधी राजापूर नगर परिषद हद्दीत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी नगर परिषदेने कठोर पाऊल उचलले आहे. नगर परिषदेने नुकतीच पकडलेली पाच मोकाट जनावरे अद्याप त्यांच्या मालकांनी सोडवून नेलेली नाहीत. त्यामुळे, जर मालकांनी वेळेत संपर्क साधला नाही, तर या गुरांचा लिलाव करण्यात येणार असल्याचा इशारा राजापूर नगर परिषदेने दिला आहे.
नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, २५ जून २०२५ रोजी नगर परिषद हद्दीतून पाच मोकाट जनावरे पकडण्यात आली आहेत. यामध्ये तांबड्या रंगाची गाय, काळ्या-सफेद टिपक्यांची गाय, काळ्या रंगाचे वासरू, पुन्हा एक काळ्या-सफेद टिपक्यांची गाय आणि एक काळ्या रंगाची गाय यांचा समावेश आहे. ही जनावरे पकडल्यापासून आजतागायत ती नगर परिषदेच्या ताब्यात आहेत, मात्र अद्याप कोणीही मालक त्यांना सोडवून नेण्यासाठी पुढे आलेला नाही.
राजापूर नगर परिषदेने सर्व संबंधित मालकांना आवाहन केले आहे की, त्यांनी तात्काळ नगर परिषदेशी संपर्क साधून आपली जनावरे सोडवून घ्यावीत. जर ०४ जुलै २०२५ नंतरही कोणीही मालक या जनावरांना सोडवून नेण्यासाठी न आल्यास, राजापूर नगर परिषदेमार्फत या सर्व गुरांचा कधीही लिलाव करण्यात येईल, असे मुख्याधिकारी, राजापूर नगर परिषद यांच्या वतीने कळवण्यात आले आहे. यामुळे मोकाट जनावरांच्या समस्येवर आळा घालण्यासाठी नगर परिषद सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.
➖
━━━━━━━━━━━━










