राजापुरातील अर्जुना नदीपात्रातील घटनेने घातले सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन
राजापूर (प्रतिनिधी)सध्याच्या काळात मानवी अवस्था आणि कृतीबाबत कानी पडणाऱ्या अनेकविध घटना मन सुन्न करून टाकतात. मात्र, शुक्रवारी सकाळी राजापूर शहरात घडलेल्या एका घटनेने डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. प्राण्यांच्यात देखील प्राणीदया ओतप्रोत भरलेली असते याचे दर्शन आज घडले. अर्जुना नदीच्या पात्रालगत असणाऱ्या मातीच्या ढिगाऱ्यावरून नदीपात्र पडून एक गाय वाहून जात असल्याचे तेथेच चरत असलेल्या तीन म्हैशींच्या लक्षात आले व त्यांनी थेट नदीत उतरत या वाहून जाणाऱ्या गायीला काठावर आणताना तिचे प्राण वाचवले. हा सगळा घटनाक्रम राजापूर नगर परिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी संदेश जाधव यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला आहे.
१० जुलै रोजी शहरातील गुरूवारचा आठवडा बाजार आटोपल्यानंतर त्याठिकाणी जमा झालेला कचरा गोळा करण्याचे काम शुक्रवारी सकाळी राजापूर नगर परिषदेचे सफाई कर्मचारी करत होते. त्याठिकाणी राजापूर नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी संदेश जाधवही उपस्थित होते. साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास बाजार भरणाऱ्या राजापूर बंदर धक्क्यावर स्वच्छतेचे काम सुरू असताना एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यापडून नदीपात्रात पडली. अर्जुना नदीचा प्रवाह जोरदार असल्याने ती गाय वाहून जाऊ लागली. त्याचवेळी तेथेच असणाऱ्या असणाऱ्या तीन म्हैशींनी लागलीच पाण्यात उतरताना व त्या बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूंनी आधार देत पलिकडच्या काठावर आणले. गाय पलिकडे नदीपात्राच्या बाहेर आल्यानंतर गायीने मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्व त्या तीनही म्हैशींकडे एक कटाक्ष टाकला व ती नदीपात्रा बाहेर गेली. त्यानंतर या तीन म्हैशी देखील नदीपात्राबाहेर आल्या.
या सर्व थराराचे चित्रिकरण नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी श्री. जाधव यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केले. त्या तीन म्हैशींनी एका गायीचा वाचवलेला जीव राजापुरात चर्चेचा विषय होता. सध्याच्या मोबाईलच्या युगात अपघाताचे फक्त मोबाईलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या व सेल्फी घेणाऱ्या माणसांसाठी मुक्या जनावरांनी हा दिलेला एक धडाच असल्याचे यावरून स्पष्ट झाले.












