मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अंशतः अनुदानित शाळां विषयावर बैठक

गौरव पोंक्षे माखजन

राज्याचे जलसंपदा,आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्रुटीपात्र अनुदानित शाळांना वैकल्पिक समान टप्पा देण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात संपन्न झाली आहे. चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे आणि शिक्षक समन्वय संघाच्या मागणीनुसार, १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयातील त्रुटीपात्र टप्पा अनुदानावरील राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना १ जानेवारी २०२३ पासून वैकल्पिक समान टप्पा देण्याचा मागणीबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली आहे.
या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण ,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार श्रीकांत देशपांडे,राज्याचे शालेय शिक्षण सचिव रंणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत यांच्यासह समन्वय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते .
१४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयातील सर्व बाबी जशाच्या तशा नवीन शासन निर्णयात समाविष्ट करण्याबाबत या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी १२ आणि १५ फेब्रुवारी २०२१ च्या शासन स्तरावरील त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना १ जानेवारी २०२३ पासून मानिव रीतीने देय टप्पा नवीन शासन निर्णयात समाविष्ट करण्याची आग्रही मागणी केली आहे. मंत्री गिरीश महाजन, यांनी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल यांना यासंदर्भात निर्देश देऊन या शाळांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे यावेळी सूचित केले . तसेच निधीची तरतूद शासनाने घोषीत केल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात संबंधित हेडला निधी जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले, “चाळीसगाव मतदारसंघातील शिक्षक आणि राज्यातील शाळांच्या हितासाठी मी कटिबद्ध आहे. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना त्यांचा हक्काचा टप्पा मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.”
यावेळी शिक्षक समन्वय संघाचे सदानंद लोखंडे, संतोष वाघ, संजय डावरे, गजानन काकड, महेंद्र बच्छाव ,भारत जामनिक,पुंडलिक रहाटे,आदी उपस्थित होते.
मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यावर सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांच्या नेतृत्वात शिक्षक समन्वय संघाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ,१४ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व घटकांना न्याय देण्याची विनंती केली, यावेळी मा.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी दिलेला शब्द पाळणार आहे आपल्याला ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वाढीव टप्प्याचे वेतन आपल्या खात्यात जमा होईल असे आश्वासन यावेळी दिले. व राज्यात निधी संदर्भात चाललेल्या संभ्रम यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूर केलेला आहे हा निधी याच महिन्यात संबंधित हेडला जमा होणार असल्याचे स्पष्ट केले.