‘पहलगाम’ शब्द उच्चारला, तरी तो भीषण दहशतवादी हल्ला डोळ्यांंसमोर येतो. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. काश्मीरच्या सौंदर्यांचे वर्णन करताना ‘पृथ्वीवरील नंदनवन’ हा शब्द नेहमीच वापरला जातो. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी नंदनवनातील पहलगामच्या निसर्गरम्य ‘बैसारन व्हॅली’मध्ये रक्ताचे सडे पडले. हा दिवस केवळ त्या २६ निष्पाप जीवांच्या बलिदानाच्या स्मरणाचा नाही, तर दहशतवादाविरोधात भारत देश किती ठामपणे उभा आहे, याचं प्रत्यंतर दर्शवणारा आहे. बैसारन व्हॅलीमध्ये पर्यटक घोडेस्वारीचा आणि निसर्गाचा आनंद घेतात. त्यादिवशी दुपारी १ ते ३ च्या सुमारास अचानक ४ ते ७ सशस्त्र दहशतवादी जंगलातून बाहेर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले बहुतांश पर्यटक होते. हल्ल्याच्या त्या भीषण क्षणांमध्ये केवळ मृत्यूचे तांडव नव्हते, तर माणुसकीची काही उदाहरणेही जगाला पाहायला मिळाली. आदिल हुसेन शाह नावाच्या एका स्थानिक खेचरस्वाराने पर्यटकांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दिलीप देसले आणि अतुल मोने यांच्यासह देशाच्या विविध भागांतील पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेले भारतीय नौदलाचे अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल हेदेखील या हल्ल्याचे बळी ठरले. हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्तान पुरस्कृत ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केवळ निषेध व्यक्त करून थांबायचे नाही, अशी ठाम भूमिका घेतली. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ७ मे २०२५ रोजी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, ज्यात सुमारे १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या संघटनांची महत्त्वाची केंद्र उद्ध्वस्त करण्यात लष्कराला यश मिळाले. ही मोहीम केवळ २३ मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण झाली, ज्यामध्ये ‘राफेल’ विमानांचा वापर करण्यात आला होता. त्याव्यतिरिक्त भारताने पहिल्यांदाच १९६० चा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत हा करार व्यवहारात राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भारत सरकारने घेतली. पाकिस्तानशी व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचं कंबरडे मोडलं.
या हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक मोठे बदल करण्यात आले. क्यूआर कोड आणि डिजिटल ट्रॅकिंगची पद्धत अवलंबली गेली. पर्यटकांच्या प्रत्येक वाहनाला आणि घोडेस्वारांना विशेष क्यूआर कोड दिले जाऊ लागले. त्यामुळे कोणता पर्यटक कोणत्या भागात आहे, याची अचूक माहिती नियंत्रण कक्षाला मिळू लागली. पहलगाम आणि बैसारन व्हॅलीसारख्या दऱ्याखोऱ्यांतील घनदाट जंगलांच्या भागात २४ तास उच्च-गुणवत्तेच्या ड्रोनद्वारे गस्त घातली जात आहे. जंगलात कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ अलर्ट दिला जातो. स्थानिक लोकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
दहशतवाद्यांना स्थानिक स्तरावर कोणताही आधार मिळणं आता कठीण होत आहे. लष्कर आणि स्थानिक पोलीस यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी विशेष ‘क्विक रिस्पॉन्स टीम्स’ तैनात करण्यात आल्या आहेत, ज्या ५ मिनिटांच्या आत कोणत्याही घटनास्थळी पोहोचू शकतात. काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि पोलिसांनी संयुक्त ‘ऑपरेशन महादेव’ राबवलं. २८ जुलै २०२५ पर्यंत पहलगाम हल्ल्यात थेट सहभागी असलेल्या सुलमान उर्फ फैजल जट आणि हमजा अफगाणी यांसह सर्व प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठी असलेली ‘सार्क व्हिसा सवलत योजना’ रद्द करण्यात आली असून पूर्वी दिलेले व्हिसाही अवैध ठरवण्यात आले आहेत. अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील नागरिक आणि मालाची ये-जा थांबली आहे. आज एक वर्षानंतर पहलगाम पुन्हा पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे. काश्मीरमधील पर्यटनस्थळांवर क्यूआर कोड आधारित पडताळणी यंत्रणा आणि तंत्रज्ञानावर आधारित कडक निगराणी ठेवली जाते आहे. स्थानिकांच्या मनात अजूनही जखमा ओल्या असल्या तरी दहशतवादाला थारा न देण्याचा त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला आहे. पहलगामचा हा हल्ला केवळ पर्यटकांवरचा हल्ला नव्हता, भारताच्या अखंडतेवर आणि शांततेवर केलेला आघात होता, अशी भारतीयांची भावना आहे. शहीद झालेल्या २६ जीवांना आदरांजली वाहताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अशा भ्याड कृत्यांनी भारताचा विकास आणि काश्मीरची प्रगती यापुढेही थांबणार नाही. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने उभं राहायला हवं. या दुःखद घटनेतून सावरत असताना आपण त्या बलिदानाचं स्मरण ठेऊया आणि शांततापूर्ण व सुरक्षित भारताच्या निर्माणासाठी कटिबद्ध होऊया. पहेलगाम हल्ल्यातील शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीत. हा देश तुमच्या धैर्याचा आणि त्या भयाण दिवशी दाखवलेल्या माणुसकीचा सदैव ऋणी राहील. दहशतवादाचा अंत आणि शांततेचा सूर्योदय हाच देशवासीयांचा निश्चय आहे. त्या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना आणि वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!











