रत्नागिरी ः प्रतिनिधी
अमली पदार्थ विरोधी कारवाई सक्षम व प्रभावी होण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक आहे. जनतेने अमली पदार्थ नाकारले तरच ही दुहेरी कारवाई होईल अन्यथा फक्त पोलिस ही एकेरी कारवाई करुन अमली पदार्थांचा प्रश्न सुटणार नाही. अमली पदार्थांचा तरुण पिढीवर घातक परिणाम होत असून रत्नागिरी पोलीस प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून असे गुन्हे पुन्हा-पुन्हा करणार्या सराईतांवरता आता ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले कि, अमली पदार्थ विक्री करणार्यांची आणि पुरवठा करणार्यांची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी रत्नागिरी पोलिस विभाग सातत्याने कारवाया करत आहे. गुन्हेगारांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. यापुढे फक्त कारवाईच नाही, तर कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी कठोर उपाययोजना राबवल्या जातील. अमली पदार्थ तस्करी व विक्री प्रकरणी ज्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर तडीपारीचे प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आले आहेत. तसेच, ज्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याविरोधात आता मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अमली पदार्थविरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात पुरवठा करणारे नेटवर्क, स्थानिक वितरक, तसेच त्यामागील आर्थिक साखळी यांचा तपशीलवार शोध घेतला जात आहे. फक्त पोलिस कारवाया करुन अमली पदार्थ विरोधी कारवाया प्रभावी होणार नाहीत. त्यासाठी जनतेने अमली पदार्थ नाकारावे असे आवाहन अधिक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.











