चोरीची तक्रार दिल्यानंतर केवळ दोन तासात दुचाकीसह आरोपी ताब्यात

पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांची कौतुकास्पद कामगिरी

सावंतवाडी । प्रतिनिधी :
दुचाकी चोरीची तक्रार दाखल केल्यानंतर केवळ दोन तासात गाडीसह चोरट्याला जेरबंद करण्याचा करिष्मा सावंतवाडी पोलीसांनी केला आहे. विनोद मधुकर राऊळ (२८, रा. वेर्ले ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. सावंतवाडीचे पोलीस उप निरीक्षक सूरज पाटील यांनी ही कारवाई केली. त्यांच्या या कामगिरीबाबत वरिष्ठांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार शिवाजी चौक येथून १८ जून रोजी गजानन रघुनाथ वाडकर यांच्या मालकीची होडा कंपनीची एव्हिएटर दुचाकी चोरीस गेली होती. मात्र, मालक दुबईला असल्याने याबाबतची तक्रार देण्यात आली नव्हती. रविवारी याबाबत तक्रार दिल्यापासून केवळ दोन तासात पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यानी वेर्ले येथुन गाडीसह आरोपीला ताब्यात घेतले. गाडीचा व चोरट्याचाही त्वरित तपास लागल्याने गाडी मालक गजानन वाडकर यांनीही समाधान व्यक्त केले असून उपनिरीक्षक सुरज पाटील यांचेही आभार मानले आहेत.