नापणे धबधब्याची कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून पाहणी
जिल्हाधिकारी अनिल पाटील, सीईओ श्री खेबुडकर यांची उपस्थिती
वैभववाडी : काचेच्या पुलावरून नापणे धबधबा व नैसर्गिक सौंदर्य पाहणे हा एक आनंददायी असा अनुभव आहे. मुख्य धबधब्याचे पर्यटकांना समोरून दर्शन होण्यासाठी सुरक्षितेची काळजी घेऊन काय करता येईल याबाबत विचार केला जाईल. तसेच येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.असे आश्वासन कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले.
मंगळवारी आयुक्त सूर्यवंशी यांनी नापणे धबधबा येथील काचेचा पुल व धबधबा परिसराची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, काचेच्या पुलावरून धबधबा व येथील निसर्ग सौंदर्य पाहणे हे अतिशय आनंददायी व सुंदर असा हा अनुभव आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना प्राथमिक सुविधा यामध्ये टॉयलेट असेल, चेंजिंग रूम खाण्यापिण्याची व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी स्थानिक सरपंच व ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घेतील. परिसरात खाजगी जागा आहे या जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी काही सेवा सुविधा देता येथील का याबाबत विचार करण्यात येत आहे. या ठिकाणी राज्यभरातून पर्यटक येत आहेत. या पर्यटकांना या भागातील स्थानिक बचत गटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ असतील किंवा इतर काही उत्पादने असतील ती या ठिकाणी विक्रीला ठेवता येऊ शकतील. या धबधब्यावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना या भागाची माहिती देण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देऊन याठिकाणी गाईड म्हणून ठेवता येण्यासारखे आहे. यातून या धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत राहील असेही सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नापणे सरपंच प्रदीप जैतापकर यांनी कोकण आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार केला










