खेमनाथ गोविंदा पथकाचा आठ थरांचा विक्रम कायम; रायगडसह कोकणात दणका

महाड, १६ ऑगस्ट २०२५ –
सुसेरी-खारी, खेड येथील खेमनाथ गोविंदा पथकाने यंदाही आपल्या दमदार कामगिरीने कोकणासह रायगड जिल्ह्यातील दहीहंडी उत्सवांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. गेले अठरा वर्षे मुंबईपासून लांजा पर्यंत ८-८ थरांचे मानवी मनोरे रचणारे हे पथक यंदाही महाड, लोणेरे आणि गोरेगाव येथे रंगलेल्या दहीहंडी उत्सवात आठ थरांचा विक्रम राखण्यात यशस्वी झाले.

महाड येथे नामदार भरतशेठ गोगावले मित्र मंडळ आयोजित दहीहंडी सोहळ्यात खेमनाथ गोविंदा पथकाने आठ थरांचा मानवी मनोरा रचत महाडकरांची मन जिंकली. याच पथकाने लोणेरे आणि गोरेगाव येथेही आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी प्रेमींना थक्क केले. या विक्रमात पथकातील लहानग्या खेळाडूंनी दिलेले योगदान विशेष ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथकातील केवळ सात वर्षांची रणरागिणी वैष्णवी पवार (मार्कंडी, चिपळूण) हिने आठव्या थरावर चढून उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला. वैष्णवीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला वर उचलणारा बाळगोपाळ रुषभ पिंपरे ‘हिरो’ ठरला. तसेच गोरेगाव येथील उत्सवात बाळगोपाळ एक्के उचलणारा सिद्धेश बंगाल, टॉपरला उचलणारा परेश पिंपरे आणि आठव्या थरावर सलामी देणारा समर्थ भांबड (वय १५) यांनी खेमनाथ पथकाचा सन्मान आणखी उंचावला.

या यशामागे पथकाचे प्रशिक्षक महेश कंचावडे आणि सूर्यकांत म्हादे यांचे कसून प्रशिक्षण, तसेच पथकासाठी दिवसरात्र झटणारे अध्यक्ष व व्यवस्थापक डॉ. विक्रांत पाटील यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

खेमनाथ गोविंदा पथकाचे सर्वेसर्वा माजी आमदार माननीय संजयराव कदम यांच्या प्रेरणेने आणि पाठबळाने हे पथक आज रायगडसह संपूर्ण कोकणात गौरवले जात आहे. रायगड जिल्ह्यात आठ थरांचा विक्रम नोंदवून खेमनाथ गोविंदा पथकाने पुन्हा एकदा आपल्या परंपरेचा आणि ताकदीचा ठसा उमटवला आहे.