शिवशक्ती मित्रमंडळ, गुरववाडी बुरंबाडतर्फे अमोल गुरव व गणपत पांचाळ यांचा गौरव

बुरंबाड (वार्ताहर) : “गावाची शान व समाजाचा अभिमान असणाऱ्या व्यक्तींना योग्यवेळी सन्मान देणे हीच खरी परंपरा आहे,” या भावनेतून शिवशक्ती मित्रमंडळ, गुरववाडी बुरंबाड तर्फे गौरी गणपती उत्सवांर्तगत अमोल गुरव आणि गणपत पांचाळ यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

रत्नागिरी जिल्ह्याचे नामांकित अमोल गुरव जिल्ह्यातील उत्तम बैल नांगरणी स्पर्धेतील नामांकित जॅकी म्हणून ओळखले जातात.आतापर्यंत झालेल्या अनेक स्पर्धांत त्यांनी आपली कसब, धाडस व कौशल्य सिद्ध करून विजेतेपद मिळवले आहे.पारंपरिक बैलसंस्कृतीची जोपासना करण्यासोबतच त्यांनी युवकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मंडळाच्या वतीने त्यांना शाल, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शिवशक्ती मित्रमंडळाचे अध्यक्ष गणपत पांचाळ यांची श्रीक्षेत्र नाणीज नरेंद्र महाराज संस्थान संगमेश्वर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या निवडीमुळे समाजकार्यात नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य पुढे अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास मंडळाचे सल्लागार दत्ताराम गुरव,सचिव गणेश सुर्वे आणि माजी अध्यक्ष संजय पांचाळ यांनी व्यक्त केला. गौरी गणपती उत्सवाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सत्कार सोहळ्यास मंडळाचे पदाधिकारी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “अमोल गुरव आणि गणपत पांचाळ यांसारखी व्यक्तिमत्त्वे गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा अभिमान आहेत. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचा व समाजाचा सन्मान आहे.”या सत्कार सोहळ्याने गुरववाडी-बुरंबाड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि पुढील काळातही समाजहितासाठी उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.