रत्नागिरी, :- जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. याकरिता 8 सप्टेंबर 2025 पासून जिल्ह्यात ग्रामस्तरावर विशेष मोहिमेचे आयोजन करण्याच्या सूचना कृषी, महसूल व ग्रामविकास विभांगाना दिल्या.
सदर मोहिमेमध्ये कृषि, महसूल व ग्रामविकास विभागातील अधिकारी /कर्मचारी यांच्यामार्फत ग्रामस्तरावर शेतकरी नोंदणीचे काम करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषि अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी याचेशी संपर्क साधून आपल्या गावात होणाऱ्या कॅम्पची माहिती घेऊन उपस्थित रहावे आणि आपला फार्मर आय डी काढून घ्यावा.
राज्यात ११ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयान्वये कृषि विषयक योजना पीक विमा, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पी एम किसान योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेमधील लाभार्थी यांना अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे.
खरीप हंगाम पिकांची ई पिक पाहणी ॲप मध्ये ऑनलाईन पद्धतीने नोंद करण्याकरिता शेतकरी स्तरावरील मुदत 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. पीक विमा सहभाग, भात खरेदी-विक्री व शासनाच्या इतर योजनेकरीता ई पिक पाहणी करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी अप मध्ये ऑनलाईन पद्धतीने पिकांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकरी नोंदणीसाठी 8 सप्टेंबर पासून ग्रामस्तरीय मोहिमेचे आयोजन











