पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
लोरे नंबर १ येथे अभियानाचा झाला शुभारंभ
देशात आणि राज्यात रयतेचे राज्य, प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन होते सुखकर
कणकवली
प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकर व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची संकल्पना आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे रयतेचे राज्य होते. तसे महायुतीचे सरकार काम करत असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात महायुती सरकार खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य म्हणून काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ज्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करत आहे, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील, जेव्हा मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या राज्यस्तरावरील निकाल जाहीर केले जातील त्यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गला सन्मानाने आमंत्रित केले जाईल असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या लोरे नंबर १ येथील शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडक,सरपंच अजय रावराणे, प्रांताधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, दिलीप तळेकर संतोष कानडे, राजेन चिके,राजू रावराणे,तन्वी मोदी,राजेश रावराणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागात सकारात्मक बदलांचा प्रवाह सुरू झाला असून त्याचे उत्तम उदाहरण लोरे हे गाव ठरत आहे. आदर्श गाव कसे असावे हे पाहायचे झाल्यास लोरे गावाचा अनुभव प्रत्येक सरपंचाने घ्यावा, असे मत त्यांनी मांडताना कणकवली तालुक्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक चांगले सरपंच काम करत आहे कलमठ गावात संदीप मेस्त्री चांगले काम करत आहे. अशा चांगले काम करणाऱ्या सरपंचाची एक टीम जिल्हापरिषदने तयार करावी. ही टीम जिल्ह्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये पाठवा आणि त्या ठिकाणी काम करत असणारे सरपंच सदस्यांना मार्गदर्शन कसे मिळेल आणि या अभियानाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची चळवळ कशी उभी करता येईल यासाठी प्राधान्य क्रम द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्यासोबत आहे.
गावातील नागरिकांनी एकत्रितपणे काम करून निर्माण केलेल्या आदर्श वातावरणामुळे लोरे गाव आज इतरांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे. त्याकांची व्याप्ती वाढवा अपेक्षा यावेळी व्यक्त केली. सरपंचांनी आपल्या कर्तृत्वातून गावाचा सर्वांगीण विकास साधावा आणि राज्यासमोर ‘आदर्श गाव’ म्हणून उदाहरण निर्माण करावे, असा आवाहन सुद्धा यावेळी मंत्री नितेश राणे यांनी केले.
पुढील पंधरा दिवसांत सर्वांनी मनापासून काम करून गावागावात विकासाची चळवळ उभारावी, अशी आवाहनपर सूचना देखील करण्यात आली. “प्रत्येक गावात सामान्य माणसाचे जीवन सुखकरe व्हावे, हीच खरी ग्रामविकासाची दिशा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ज्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करत आहे, त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निमित्ताने देशातील व राज्यातील नेतृत्वावरही विशेष प्रकाश टाकण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. त्यांच्या उपक्रमांमुळे सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडून येत असून घराघरात आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गती वाढली असून ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम गतीमान झाले आहे.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्यांनी आगामी काळातही देशसेवेचे कार्य याच निष्ठेने करावे, अशी प्रार्थना आपापल्या ग्रामदेवतेकडे करावी असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.