नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता.

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची आज बुधवारी स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन दिवसभर बंद होते. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता अभिषेक, सालंकृत पूजेनंतर दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले.अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला पाच दिवस राहिले असून, आज बुधवारी देवीच्या मूळ गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. अंबाबाईचा सकाळी साडेआठचा अभिषेक केल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरण्यात आले. त्यानंतर दिवसभर गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.यामध्ये श्रीपूजक, सफाई कर्मचारीदेखील सहभागी झाले. भाविकांना देवीचे दर्शन व्हावे यासाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिर येथे दर्शनासाठी ठेवली होती. सायंकाळी साडेसहा वाजता देवीचा अभिषेक, सालंकृत पूजा व आरती झाल्यानंतर मूळ मूर्तीचे दर्शन सुरू करण्यात आले.

अग्निशमन यंत्रणेकडून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मंगळवारी दुपारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरात बंदोबस्ताला असलेले पोलिस, सुरक्षा रक्षक, देवस्थान समितीचे कर्मचारी व दुकानदारांना अग्निशमन यंत्रणा कशी हाताळावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन नवरात्रौत्सवात रोज अंबाबाई मंदिर आवारात देवस्थान समितीतर्फे भजन, कीर्त, भावगीते, भक्तिगीते, भरतनाट्यम, कथम, गोंधळ यासह पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्यासाठी समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून, पुढील दोन दिवसांत कार्यक्रमांचे वेळापत्रक ठरवले जाईल.