संविधान प्रस्ताविकेच्या विश्वविक्रमी महागायन सोहळ्यात होडावडेतील

श्रिया माणगांवकर यांचा सहभाग

कोल्हापूर येथील ग्रुपमधून संस्कृत भाषेत केले गीत गायन

तळवडेतील ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी स्कूल येथे कार्यरत

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सुमधुर संगीताच्या ठेक्यावर सोळाशे कलाकारांनी सादर केलेल्या भारतीय संविधानातील प्रस्ताविकेने कोल्हापुरातील दसरा चौकात अनोख्या विश्वविक्रमाची नोंद केली. मुंबई कोकण सह विविध जिल्ह्यातील कलाकार प्रस्ताविका गायत सोहळ्यात सहभागी झाले होते. देशातील विविध भागातून आलेल्या गायक कलाकारांनी मराठी, इंग्रजी, संस्कृत, आसामी, मैथिली, राजस्थानी, हिंदी, भोजपुरी, उर्दू, नेपाळी यासारख्या वीस भाषेतील संविधान पुस्तिकेचे गायनाद्वारे सादरीकरण केलं. यातील संस्कृत भाषेतील संविधान गायनात तळवडेतील ब्लूमिंग बड्स प्री प्रायमरी स्कूलच्या शिक्षिका तथा होडावडे येथील रहिवासी सौ. श्रीया मंगेश माणगांवकर यांनी सहभाग घेतला. लवकरच त्यांना या सहभागाबद्दल मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सौ. श्रीया माणगांवकर यांना कोल्हापूरच्या एका ग्रुपमधून या कार्यक्रमाविषयी माहिती मिळाली. त्यावेळी संस्कृत या भाषेसाठी नाव नोंदणी करून पाठवलेल्या ट्रॅक नुसार त्यांनी गीताचा सराव सुरू केला. त्यानंतर रविवारी झालेल्या या संविधान गीत गायनाच्या महासोळ्यात त्यांनी प्रत्यक्ष गायनात सहभाग घेतला.
दरम्यान, संविधानाच्या प्रस्ताविकेचे विश्वविक्रमी महागायन हा कौतुकास्पद आणि अभिनंदनीय उपक्रम असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. रविवारी सायंकाळी हा सोहळा रंगला.
भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतीय संविधान आणि लोकतंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त ‘हम भारत के लोग ‘ हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था
तसचं अश्वघोष कल्चर फाऊंडेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी कोल्हापुरातील दसरा चौकात संपन्न झाला.
कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी अमोल हेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कबीर नाईक नवरे यांच्या संकल्पनेतून ‘हम भारत के लोग ‘ अर्थात संविधान गिताचा महा विश्वविक्रम हा
कार्यक्रम सादर झाला.
धमेंद्र देशमुख यांनी संविधान पुस्तिकेच्या गायनाचा विश्वविक्रम झाल्याचे जाहीर केलं. विश्वविक्रमाचे प्रशस्तीपत्र कार्यक्रमाचे संकल्पक कबीर नाईक नवरे यांना नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. संविधान पुस्तिकेचे विश्वविक्रमी महागायन हा कौतुकास्पद कार्यक्रम असल्याचं नामदार आठवले यांनी सांगितलं.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, प्राध्यापक आनंद भोजणे, सतीश मार्गे, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तीन तासाहून अधिक काळ रंगलेल्या या सोहळ्यासाठी दसरा चौकात रसिकांनी मोठी गर्दी केली होती.