अश्लिल व्हिडीओ पाठवणे पडले महागात ; कणकवलीतील घटना
कणकवली : मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या चालकास तालुक्यातील महिलेने गाठून थोबडावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी शहरातील तिकीट बुकींग सेंटरनजीक घडली. मात्र, या प्रकाराची पोलीस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नव्हती.
तालुक्यातील एका गावातील महिलेने एका नामांकित कंपनीच्या खाजगी बसची तिकीट कणकवलीत एका तिकीट बुकिंग करणाऱ्या ऑफिसकडे काही महिन्यांपूर्वी बुक केली होती. सदरची महिला जेव्हा मुंबईला जायची तेव्हा त्या नामांकित कंपनीच्या बसने प्रवास करायची. दरम्यान, मंगळवारी त्या खाजगी बस चालकाने तिकीट बुकींगच्या आधारे महिलेचा मोबाईल नंबर घेऊन त्यावर अश्लील विडिओ पाठवले. चूक झाली असेल किंवा चुकून फॉरवर्ड झाला असेल यासाठी त्या महिलेने अश्लील कृत्य करणाऱ्या चालकाला फोन केला. मात्र त्या चालकाने त्या महिलेचा फोन उचलला नाही. पुन्हा एकदा त्या बस चालकाने विडिओ पाठवला. त्या नंतर सदर महिलेच्या लक्षात आले की समोरचा व्यक्ती हा जाणूनबुजून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.
अखेर त्या महिलेने सोबत एक महिला घेऊन कणकवलीतील ते तिकीट बुकिंग सेंटर गाठले. यावेळी त्या महिलेला समजले की ते व्हिडिओ पाठवणारा खाजगी बसचा चालक आहे. दरम्यान त्याच वेळी ५:३० वा. च्या सुमारास खाजगी बस घेऊन मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी आला असता त्या महिलेने सोबत एका महिलेला घेऊन त्या चालकाला जाब विचारला. यावर तो निरुत्तर झाला. दरम्यान त्या दोन महिलांनी त्याला सर्व्हिस रस्त्यावरच सर्वांसमोर चांगलाच प्रसाद दिला.
दरम्यान हा प्रकार घडला त्या महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही. त्यामुळे त्या खाजगी बस चालकावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. परंतु खाजगी बसने अनेक महिला, मुली प्रवास करत असतात. त्या विश्वासाने करतात. त्यामुळे असे प्रकार सुरू झाले तर खाजगी बसने प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षा धोक्यात येऊ शकते.