वनविभागाच्या कुर्णे येथील राखीव क्षेत्रातून सागाची चोरी 

३ लाख १४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त, गुन्ह्यातील क्रेनही जप्त, ७ जणांना ताब्यात 

लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील कुर्णे येथील वन विभागाच्या राखीव क्षेत्रातून सागाच्या ७ झाडांची चोरी करून त्यांची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी वनविभागाने राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथील एकूण ७ जणांना ताब्यात घेतले आहे .यामध्ये ३ लाख १४ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल देखील वनविभागाने जप्त केला असून या घटनेत वापरण्यात आलेली क्रेन देखील जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा तालुक्यातील कुर्णे येथे वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी जंगल फिरती करत असताना वनपाल सारीक फकीर आणि वनरक्षक यांना या राखीव क्षेत्रातून साग जातीची एकूण ७ झाडे चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली होती.या सात झाडांपैकी काही मुद्देमाल हा त्याच ठिकाणी आढळून आला होता. तर काही माल लंपास केला असल्याचे दिसून आले.या चोरी प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात चोरट्यांवर दिनांक ३० ऑगस्ट रोजी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) फ प्रमाणे पुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वनविभागाकडून या चोरीचा तपास लावण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली होती.

या तपासाअंती पोलीसांनी संशयित आरोपी म्हणून (१) मनोज संजय पाटणकर (२) मंदार संजय पाटणकर(३) अजय नागूप्रसाद निषाद (४) शत्रूघ्न दत्ताराम गोठणकर (५) विजयकुमार रामशंकर निषाद (६) मंदार मनमोहन बारस्कर (७) शुभम रवींद्र गुरव सर्व रा.कुंभवडे अशा सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्यामधील मुद्देमाल हा रातोरात क्रेन यंत्राने ट्रकमध्ये भरुन कुर्णे ते कुंभवडे येथे वाहतूक करुन तो तेथे उतरवून तो मुद्देमाल परत क्रेन यंत्राने दुसऱ्या ट्रक मध्ये भरून मौजे माडबन येथील माडबनकडे जाणाऱ्या कसबा मिठगवाने पिकपशेड पासुन साधारणपणे ४०० मी अंतरावर स्थानिक नाव पठार येथे लपवून ठेवला असल्याचे संशयित आरोपी मनोज संजय पाटणकर याने सांगितले

यानुसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन सदर गुन्ह्यामधील मुद्देमाल एकूण साग नग ३१/७.४९५ घमी. इतका असून,त्याची बाजार भावाने अंदाजे किंमत रू.३,१४,७९०/- इतका माल वनाधिकारी राजापूर यांनी ताब्यात घेतला आहे. सदरचा साग माल हा वनरक्षक लांजा यांच्याकडे सुरक्षेच्या कारणास्तव ताबा पावतीने ताब्यात देण्यात आलेला आहे. तर या गुन्ह्यात वापरलेली क्रेन क्रमांक एम एच. ०९ जीएम ०४५२ ही जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर वन गुन्ह्यामध्ये समाविष्ट असणारी वाहने व इतर साधन सामग्री इत्यादी बाबींचा तपास चालू आहे.

सदर गुन्हेकामी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर श्री .गुरुप्रसाद, विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीम.गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक श्रीम.प्रियंका लगड चिपळूण रत्नागिरी , यांचे मार्गदर्शन खाली कार्यवाही केली जात असून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, वनपरिक्षेत्र वनअधिकारी फिरते पथक रत्नागिरी जितेॅद गुजले, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनपाल लांजा सारीक फकीर , वनपाल पाली.न्हानू गावडे, वनपाल देवरुख सागर गोसावी, वनपाल जी.एम.पाटील, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक लांजा श्रीम.नमिता कांबळे, वनरक्षक कोर्ले श्रीम.श्रावणी पवार, वनरक्षक विशाल पाटील, वनरक्षक सूरज तेली, वनरक्षक आकाश कुडकर, वनरक्षक जालने मेजर, वनरक्षक श्री.साबणे, वनरक्षक श्रीम.सुप्रिया काळे इ.उपस्थित होते.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरिजा देसाई विभागीय वनअधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.