​मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये योग प्रशिक्षण शिबिर संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शालेय विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फिटनेस योगा अकॅडमीच्या सहकार्याने पार पडलेल्या या चार दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांनी योगासनांचे प्रशिक्षण घेतले.

​या शिबिरात योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, प्राणायाम, वृक्षासन, ताडासन, शवासन, अनुलोम-विलोम तसेच आरोग्यदायी हास्य प्रकार, एरोबिक्स आणि विविध कवायतींचा सराव करून घेतला. केवळ शारीरिक व्यायामच नव्हे, तर सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहार, योग्य वर्तन आणि अभ्यासाच्या शास्त्रोक्त पद्धतींबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

​शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगसाधना करण्याचे आवाहन केले, तर संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत यांनी योगशैली आत्मसात करून आरोग्य जपण्याबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली. या वेळी फिटनेस योगा अकॅडमीच्या सदस्यांचा प्रशालेतर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अमिना नाईक व श्री. गणेश प्रभू यांनी केले.

​या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, डॉ. सतीश सावंत आणि शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन केले आहे.