सांगेली येथील युवकाचे आकस्मिक निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली आंबेडकर नगर येथील रहिवासी आणि सध्या हैदराबाद येथे नोकरीला असलेल्या ओंकार यशवंत सांगेलकर (२३) या युवकाचे शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत निधन झाले. एकुलत्या एका मुलाच्या निधनाने सांगेलकर कुटुंबीयांना धक्काच बसला असून त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सांगेली गावावर शोककळा पसरली.
ओमकारचे वडील श्याम यशवंत सांगेलकर नोकरी निमित्त नवी मुंबईत घणसोली येथे राहतात. तर ओमकार नोकरी निमित्त हैदराबाद येथे असताना पंधरा दिवसांपूर्वी चक्कर येऊन तो पडला. त्यानंतर त्याच्या मित्रपरिवाराने त्याला तेथीलच खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला विमानाने मुंबईत आणले होते. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच मागील आठवड्यात अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जे जे हॉस्पिटल नंतर भाटिया रुग्णालयात उपचार सुरू होते.
तरीही त्याची प्रकृती उपचाराला साथ देत नसल्याने शुक्रवारी त्याला नवी मुंबईच्या वाशी येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, काका, काका, काकी असा मोठा परिवार आहे. मुंबईत दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माडखोल माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अंकुश सांगेलकर यांचा तो पुतण्या होत.