धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सावंतवाडीतून मुख्यमंत्र्यांना निवेदन

लक्ष्मण पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन सादर 

सावंतवाडी । प्रतिनिधी : धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात जालन्यात सुरू असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि सदर मागणी तातडीने पूर्ण करण्याच्या विनंतीसाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई आणि सकल धनगर समाज सावंतवाडी यांच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करण्यात आले.

धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोऱ्हाडे यांनी जालना येथे धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या गंभीर विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सावंतवाडीतील धनगर समाज एकवटला.

सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबईच्या सावंतवाडी शाखेच्या कार्यकारिणी पदाधिकारी आणि समाज बांधवांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावून दीपक भाऊ बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

यावेळी मंडळाचे सावंतवाडी कार्यकारिणीचे पदाधिकारी, अध्यक्ष श्री. लक्ष्मण नवलू पाटील, सचिव श्री. विलास जंगले, उपाध्यक्ष श्री. आनंद वरक, खजिनदार श्री. लक्ष्मण धोंडू पाटील यांच्यासह सदस्य श्री. शेखर डोईफोडे, श्री. धाकू बुटे, श्री. रामा कोकरे, श्री. जनार्दन लांबर, श्री. लक्ष्मण गावडे, श्री. संजू गावडे, श्री. संतोष पाटील, श्री. संदीप पाटील, श्री. राजू पाटील, श्री. जनार्दन लांबर इत्यादी कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धनगर समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी एकजूट दाखवत, आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून शासनाने यावर त्वरित निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.