दोडामार्ग l सुहास देसाई : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने साटेली-भेडशी येथे दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात पार पडली. “देव-देश-धर्म” रक्षणाचा संकल्प घेतलेली ही दौड परिसरातील युवक, माता-भगिनी आणि ग्रामस्थांच्या प्रचंड सहभागाने एक ऐतिहासिक सोहळा ठरली.
उत्साहात झाली दौडीची सांगता
साटेली-भेडशी येथील मंदिरातून या दौडीला प्रारंभ झाला. उत्साहाने सळसळणाऱ्या युवकांनी आणि भगिनींनी गावातील नवरात्रोत्सव स्थळांना भेट देत ही दौड पुढे नेली. श्री सातेरी मंदिरात पोहोचल्यानंतर, दौडीचा समारोप चाळोबा देवस्थान येथे करण्यात आला.
हिंदू समाजाच्या एकतेचा संदेश
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी आणि हिंदू समाजाच्या एकतेसाठी युवक, माता-भगिनींनी नेहमी सज्ज राहण्याचे कळकळीचे आवाहन केले.
‘जय भवानी-जय शिवराय’च्या घोषणा
संपूर्ण दौडीदरम्यान, भगवे झेंडे आणि उपस्थितांचा प्रचंड उत्साह लक्षणीय होता. “जय भवानी-जय शिवराय” आणि “देव, देश आणि धर्मासाठी आम्ही सज्ज आहोत!” या गगनभेदी जयघोषांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या जयघोषांमुळे वातावरण निर्मिती झाली आणि दौड खऱ्या अर्थाने भक्ती आणि एकतेचा सोहळा ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, स्थानिक युवक-युवती व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवल्यामुळे ही दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली.









