रोहित आर्या प्रकरणी माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांचे विधान
सावंतवाडी । प्रतिनिधी :
मुंबईमध्ये एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्या यांच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ संकल्पनेसाठी शासनाने परवानगी दिली होती, मात्र मुलांकडून पैसे वसूल करून ते परत न केल्यामुळे त्यांचे बिल प्रलंबित राहिले. बिल अदा झालं नाही म्हणून मुलांना ओलीस ठेवण्याचं टोकाचं पाऊल उचलणं योग्य नाही. अनेक लोकांची बिले प्रलंबित असतात, पण मुलांना वेठीस धरणं चुकीचं आहे, असं मत माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, रोहित आर्या यांना सहानुभूतीपूर्वक आर्थिक मदत केली होती आणि चेकने पैसे दिले होते. माझी भूमिका सहकार्याची होती, मात्र डिपार्टमेंटचे फॉर्म्युला पार पाडणं आवश्यक होतं. चुकीचा पायंडा पाडणं योग्य नाही. नियमानुसार काम चालतं, त्यामुळे अशाप्रकारे मुलांना वेठीस धरून चुकीचे पाऊल उचलले जाणे अपेक्षित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, उद्या शनिवारी मुंबईत आपण तसेच आमदार निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत सिंधुदुर्गातील सर्व मंत्री व आमदार यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही आग्रही आहोत अशी भूमिका ही त्यांनी स्पष्ट केली. तसेच हत्ती पकड मोहीम राबविण्याची तयारी केली आहे.ओंकार हत्तीला पुढील एका आठवड्यात जेरबंद केले जाईल असेही ते म्हणाले.
महायुतीबाबत उद्या मुंबईत बैठक : आ. निलेश राणे
आम्ही महायुतीत लोकसभा, विधानसभा लढलो. त्यामुळे आताही महायुतीसाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही कोणाला कमी लेखत नाही. एकत्र लढावं हीच भुमिका आमची आहे. आमची ताकद आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. कार्यकर्त्यांना अडचणीत टाकू नये म्हणून आमची भूमिका युतीची आहे. उद्या यासंदर्भात मुंबईत महायुतीच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत सगळं चित्र स्पष्ट होईल, असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेत प्रवेश स्वखुशीने होत आहेत. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख म्हणून काम करत आहेत. कार्यकर्ते विकासकामांसाठी येत आहेत. रिझल्ट देणार काम असाव असं मी ठरवलं आहे. लोकांचा विश्वास जिंकण आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळेच एकत्रित लढावं एकमेकांच्या विरोधात उभं राहू नये ही आमची भुमिका असून त्याबाबत उद्या निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.












