BREAKING: भरणे नाका येथे भरधाव कार रस्त्याच्या खाली कोसळून भीषण अपघात

८५ वर्षीय महिला व चालक गंभीर जखमी

खेड (प्रतिनिधी) – मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात ८५ वर्षीय महिला आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी मुंबई येथून निघालेल्या स्विफ्ट कारला झालेल्या अपघातामुळे घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात असलेली एमएच 07 एबी 5354 क्रमांकाची स्विफ्ट कार भरधाव वेगात जात असताना खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरातील जाधववाडी येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यात कोसळले. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर कारच्या चाकांचे व्रण दिसून येत होते, तर महामार्गालगत असणाऱ्या गावाच्या नावाच्या फलकाला धडक देऊन कार थेट खड्ड्यात जाऊन कोसळली.
या कारमध्ये प्रवास करणारी जुबेदा शहा (वय ८५, कल्याण) आणि चालक अरबाज (वय २७) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही दोघेही स्विफ्ट कारमधून कणकवलीच्या दिशेने जात होते, अशी माहिती समोर आली आहे. अपघातानंतर तत्काळ स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून भरणे नाका परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरात विविध चर्चा रंगल्या असून, प्राथमिक अंदाजानुसार भरधाव वेगात गाडी चालवताना चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.