‘मला येथून कायमचा उचला’ या फलकाने वेधले लक्ष.
प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: शहराचे वैभव असणाऱ्या रंकाळ्यावर शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटक तसेच शहरवासीय मोठ्या संख्येने फिरायला येत असतात. त्यामुळे लहान मुलांसह आलेले पर्यटक, शहरवासीय खाद्यपदार्थांचे रॅपर्स, कागद, प्लास्टिक कचरा तेथेच उघड्यावर टाकून जातात. परंतु हा कचरा नियमितपणे उचलण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाकडून होत नाही. त्यामुळे टॉवरजवळ कचरा तसाच साचून राहतो. शेजारीच महादेव मंदिर आहे.स्थानिक नागरिकांनी या कचरा साचून राहणाऱ्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच दैनंदिन कचरा उठाव केला जात नसल्याचे निषेध करण्यासाठी रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला अभिनव आंदोलन केले.त्या ठिकाणी मृतदेहासाठी जशी तिरडी बांधली जाते तशी तिरडी बांधून त्यावर तेथील कचरा ठेवण्यात आला होता. त्यावर गुलाल, फुले वाहण्यात आली होती. त्यावर ‘मला येथून कायमचा उचला’ अशी अक्षरे असलेला फलक लावण्यात आला होता. आंदोलकांनी तेथे बोंबही मारली.त्याचवेळी हे आंदोलन झाल्यामुळे अनेक नागरिक थांबून हे आंदोलन पाहत होते. या आंदोलनाने तरी प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.











