प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील उदगाव येथे मुलाच्या वाढदिवसाची पार्टी द्यायला गेलेल्या व्यक्तीचा पार्टीला आलेल्या मित्रांनी दगड डोक्यात घालून खून केला. सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथे कृष्णा नदीच्या पात्रालगत असलेल्या जॅकवेलजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लखन सुरेश घावट ऊर्फ बागडी (वय ३५, रा. मच्छी मार्केट परिसर, जयसिंगपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.या खूनप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चौघांना अटक केली आहे. संकेत हंबर, प्रथमेश पवार,अमिन राजपूत, अरविंद माळी,अमित सांगावकर,अक्षय माने (सर्व रा. जयसिंगपूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी योगेश सुरेश घावट यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लखन घावट यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी घावट हे सहा मित्रांसोबत उदगाव (ता. शिरोळ) येथील पाणीपुरवठा जॅकवेलजवळ गेले होते. पार्टीदरम्यान किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादावादीत एका मित्राने लखनच्या डोक्यावर दगडाने वर्मी घाव केला. घटनेनंतर सर्वच मित्र पसार झाले. डोकीत वर्मी घाव झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात लखन पडले होते. जखमी अवस्थेत त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पोलिस पथकाने पाहणी केली.घटनेनंतर आरोपी फरारी खुनाच्या घटनेनंतर मित्र असलेले सहाजण फरारी झाले होते. गुन्हेशोध पथकाने शोधमोहीम राबवून रात्री उशिरा चौघांना ताब्यात घेतले; तर आणखी दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.पुढील तपास जयसिंगपूर पोलिस करत आहेत.













