नगरपरिषद हे मंदिर मानून पारदर्शक कारभार हेच शिवसेनेचे लक्ष!

ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात शिवसेना उमेदवार शपथ घेणार

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आदर्श मालवण शहर बनवणार

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडली भुमिका

मालवण | प्रतिनिधी : नगरपरिषद हे मंदिर मानून पारदर्शक कारभार हेच शिवसेनेचे लक्ष आहे. सोबत मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुती व्हावी अशीही आमची इच्छा आहे. जर काही जणांना महायुती होऊ नये असे वाटत असेल तर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेना म्हणून आम्ही सज्ज आहोत. मालवण शहर वासियांच्या आशीर्वादाने यश प्राप्त करू. असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

शिवसेनेचे उमेदवार प्रचाराला सुरवात करण्यापूर्वी ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराच्या मंदिरात देवतांचे आशीर्वाद घेतील. पालिका हे मंदिर मानून पारदर्शकरित्या कारभार करण्याची व कोणताही भ्रष्टाचार न करण्याची शपथ घेतील. विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व व ज्यांच्या नेतृत्वात वर्षभरात कोट्यावधी रुपये विकासनिधी पालिकेत आला त्या आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेना म्हणून आम्ही सज्ज आहोत. जनतेला अपेक्षित असा मालवण शहराचा विकास करून आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आदर्श असे मालवण शहर बनवणार. असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.

मालवण महायुतीच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, यावेळी मच्छीमार सेल जिल्हाप्रमुख राजा गावकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, शहर प्रमुख दीपक पाटकर, ममता वराडकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर, वसंत गावकर, उप तालुका प्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर, राजन परुळेकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, मोहन वराडकर, विलास मुणगेकर, शेखर गाड, यशवंत गावकर, जाबीर खान, संदीप मालंडकर, विनायक रेडकर, चंदू आचरेकर, प्रसाद आडवणकर, शिवाजी केळुसकर, मंदार लुडबे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता सामंत यांनी महायुती व्हावी अशी आपली भुमिका असल्याचे सांगितले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शहरात झालेल्या विकासकामांची यादी त्यांनी वाचली.

आम्ही महाराष्ट्रात महायुतीमध्ये आहोत. केंद्रातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. खासदार नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे या सर्वांनी महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीतही महायुतीने एकत्र येऊन लढावे अशी आमची सर्वांची मनापासूनची इच्छा आहे. मात्र काही मंडळींकडून वेगवेगळ्या भुमिका मांडल्या जात आहेत. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. मात्र निवडणूक निकालाच्या दिवशी सर्व चित्र पाहायला मिळेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यानंतर मालवण शहरासाठी भरीव निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. यात अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कोट्यावधी, नळपाणी योजनेसाठी ४६ कोटी रुपये, जिल्हा नियोजनमधून नगरोत्थान अंतर्गत १.३५ कोटी रुपये, क्रीडांगण संकुलासाठी ४ कोटी रुपये, शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपये आता काही महिण्यात उपलब्ध करून दिले. आणखी निधी प्राप्त होणार आहे.

कचरा प्रश्नाचे निलेश राणे यांनी व्यवस्थित नियोजन केल्यामुळेच मालवण नगरपालिकेला १ कोटीचे बक्षीस मिळाले. या मतदार संघाला निलेश राणे यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व लाभले आहे. मतदार संघाच्या शहराच्या विकासासाठी ते आग्रही राहून विकास निधी उपलब्ध करून आणत आहेत. त्यामुळे निलेश राणे या ब्रँडवरती या शहरांमध्ये १५-२० टक्के मतदान केवळ एक अभ्यासपूर्वक काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून वाढले आहे.

आमदार निलेश राणे नगरपरिषद व सातत्याने शहराच्या नियोजनाचा आणि कामांचा आढावा घेत असतात. शहर विकासात चुकीचे काहीही होऊ नये, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये या दृष्टीने नियोजन सुरु असते.

मालवण पालिकेच्या निवडणुकीसाठी महायुती व्हावी अशी आमची इच्छा आहे. मात्र ती न झाल्यास शिवसेनेचे उमेदवार प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी श्री देव रामेश्वर मंदिरात शपथ घेतील. निवडून आल्यानंतर शहरामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराचा पैसा घेणार नाही. कुठल्या कॉन्ट्रॅक्टर/बिल्डरकडे पैसे मागणार नाही. नागरिकांना त्रास देणार नाही. मी जनतेचा सेवक म्हणून पाच वर्ष पारदर्शक काम करीन अशी शपथ घेतील असे श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. एक प्रकारे जनतेला अपेक्षित असा पारदर्शक कारभार आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात केला जाईल. नगरपालिका हे मंदिर आहे. आपण या मंदिरात सेवक म्हणून जातो असे म्हणत त्यांनी समाजकारण आणि सेवाभावी वृत्तीला महत्त्व दिले. ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हे आमचे घोषवाक्य आहे. त्यामुळे आम्ही समाजकारणातूनच काम करतो. अहंकाराची भाषा कोणी करू नये असा सल्ला श्री. सामंत यांनी देत मतदाराला राजा मानण्याचे आवाहन केले.

आमदार निलेश राणेंना मालवण शहराला राज्यात अव्वल दर्जाचे शहर बनवायचे आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळतं असून पुढेही मिळेल. त्यामुळे जनतेने आम्हाला सत्ता दिली तर आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक पुढील पाच वर्षे पारदर्शक कारभार करतील असा विश्वासही श्री. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.