सावंतवाडी । प्रतिनिधी : संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटीच्या मान्यतेने श्री यशवंतराव भोंसले एज्युकेशन सोसायटी संचलित कोकणातील पहिले सैनिक स्कूल, अर्थात ‘ भोंसले सैनिक स्कूल’, चराठे वझरवाडी येथे शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी एका भव्य सोहळ्यात भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ होणार आहे. या समारंभासाठी राज्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ९.०० वाजता भूमिपूजन व शिलान्यास सोहळा पार पडेल, तर सकाळी ११.०० वाजता उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे तसेच माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती राहणार आहे.
तर तत्पूर्वी सकाळी ९ वाजता भूमिपूजन व शिलान्यास सोहळा होणार असून यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक डॉ. अरविंद कुडतरकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत संघटन मंत्री नीरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आणि अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद कोकण प्रांत अध्यक्ष मेजर विजय देगावकर हे उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन श्री यशवंतराव भोंसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत- भोंसले, सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंत- भोंसले आणि सचिव श्री. संजीव देसाई यांनी केले आहे.
’ भोंसले नॉलेज सिटी’च्या भव्य परिसरात उभारले जात असलेले ‘ भोंसले सैनिक स्कूल’ हे केवळ एक विद्यालय नसून, भविष्यातील लष्करी अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडवणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र ठरणार आहे. या शाळेमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणासाठी आता दूरवर जाण्याची गरज उरणार नाही, असे आयोजकांनी नमूद केले आहे.
या शाळेत आधुनिक शिक्षण, सैनिकी प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम साधला जाणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला सावंतवाडी आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे आता कोकणातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील सैनिकी शिक्षण स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून, या परिसराच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.












