रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी आज (दि. 2) शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारी दीड वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्याचे सरासरी मतदान 46.64 टक्के झाले आहे. सकाळच्या तुलनेत दुपारच्या सत्रात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
एकूण 1,60,457 मतदारांपैकी 77,885 पुरुष आणि 82,562 महिला मतदार आहेत. यापैकी दुपारी दीड वाजेपर्यंत 77,508 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, ज्यात 32,358 पुरुष आणि 32,493 महिला (तसेच 1 इतर) मतदारांचा समावेश आहे.
त्यामध्ये गुहागर नगरपंचायत मतदानामध्ये सर्वात आघाडीवर असून, येथे सर्वाधिक 61.28 टक्के मतदान झाले आहे.
त्याखालोखाल देवरुख नगरपंचायतीमध्ये 51.77 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
राजापूर नगरपंचायतीत 49.74 टक्के, लांजा नगरपंचायतीत 49.11 टक्के, तर खेड नगरपरिषदेत 41.34 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्याच्या मुख्यालयातील रत्नागिरी नगरपरिषदेत 34.25 टक्के मतदान झाले असून, चिपळूण नगरपरिषदेत 39.02 टक्के मतदान झाले आहे.











