शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला सज्जड इशारा; ठेकेदारांना धमकावल्याचा आरोप
दोडामार्ग: सुहास देसाई
दोडामार्ग ते विजघर या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असताना, केवळ आर्थिक स्वार्थापोटी विरोधक या कामात अडथळे आणत आहेत. ठेकेदारांच्या कामगारांना होणारी मारहाण आणि कामात पाडलेला अटकाव हा निषेधार्ह असून, हा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी नाव न घेता ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी, गुरूदास सावंत, तालुका संघटक गोपाळ गवस, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, शहरप्रमुख शीतल हरमलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विकासात खोडा घालण्याचे राजकारण!
श्री. गवस म्हणाले की, “हा रस्ता अत्यंत खराब आणि जीवघेणा झाला होता. आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न करून या राज्यमार्गाच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी भरघोस निधी मंजूर करून आणला. मात्र, विरोधक आता आमदार केसरकरांची बदनामी करण्यासाठी विकासात खोडा घालत आहेत. त्यांचा उद्देश विकास नसून केवळ स्वतःचा स्वार्थ साधणे हा आहे.”
’दिवसा विरोध, रात्री गुप्त बैठका’
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी विरोधकांवर सनसनाटी आरोप केला. “काही पदाधिकारी दिवसा कामाला विरोध करतात आणि रात्री त्याच ठेकेदारांसोबत गुप्त बैठका करतात. हा दुटप्पीपणा आहे. आमचे आरोप खोटे वाटत असतील, तर विरोधकांनी देवाच्या देवळात येऊन नारळाला हात लावून सांगावे, आम्हीही तिथे यायला तयार आहोत,” असे खुले आव्हान निंबाळकर यांनी दिले.
अधिकारी व नागरिकांची बैठक
रस्त्याबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पुढील सात दिवसांत व्यापारी, शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक होणार आहे. कामात अडथळा आणल्यास रस्ता वेळेत पूर्ण होणार नाही, ज्यामुळे पावसाळ्यात जनतेला त्रास होईल. हा त्रास टाळण्यासाठी काम सुरळीत होणे गरजेचे असल्याचे गवस यांनी सांगितले. वर्ष उलटूनही कामाच्या ठिकाणी माहिती फलक नसल्याची बाब पत्रकारांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर, तातडीने फलक लावण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाने दिले असल्याचे सांगितले












