पाणी प्रश्नी धरण आणि जलशुद्धीकरण केंद्राची केली पाहणी!
रत्नागिरी :
गेले काही दिवस पाणी कमी दाबाने येत असल्याबद्दल महिला वर्गाकडून सांगण्यात येत असल्याने, रत्नागिरीच्या नुतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारण्यापूर्वीच ‘ॲक्शन मोड’वर येत प्रभागातील दोन सहकारी नगरसेवकांसह साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि पानवल धरणाची पाहणी करुन अधिकारी वर्गाकडून समस्या जाणून घेतल्या. एक महिला नगराध्यक्षा म्हणून पाणी चांगले मिळावे एवढी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली असून ती पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे शिल्पा सुर्वे यांनी यानंतर माहिती देताना सांगितले.
मागील दोन-तीन दिवस व शनिवारीही शहरात पाणी कमी दाबाने येत असल्याने अनेक महिलांनी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी फोन करुन माहिती दिली. महिलांच्या समस्यांची जाणीव असल्याने आणि महिलांना पाण्यासाठी काय आटापिटा करावा लागतो हे माहित असल्याने शिल्पा सुर्वे यांनी प्रभाग 5मधील सहकारी नगरसेवक सौरभ मलुष्टे, पूजा दीपक पवार यांना सोबत घेत प्रभाग 5मधील पाण्याची टाकी गाठली. तत्पूर्वी त्यांनी नगर पालिका पाणी विभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावून घेतले. न.प.तील अधिकारी चाळके व पवार हेही तातडीने साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रात दाखल झाले. याठिकाणी नगराध्यक्षांनी पाहणी केली व जलशुध्दीकरण केंद्र आणि पाण्याच्या टाकीबाबत माहिती घेतली. पाण्याचे कशा पध्दतीने शहरात वितरण होते हेही त्यांनी जाणून घेतले. पाणी योग्यरितीने नागरिकांना मिळायला हवे अशा सूचनाही त्यांनी स्पष्टपणे दिल्या.
जलशुध्दीकरण केंद्राजवळच सध्या कचरा प्रकल्प असल्याने, प्लॅस्टीक कचरा सर्वत्र उडत असतो. त्यामुळे प्लॅस्टीक कचऱ्या रिसायकलिंग करण्याचा प्रकल्प उभारण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली निधी मिळवून हा प्रकल्प कार्यन्वित करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया राबवण्यावरही त्यांनी सहकारी नगरसेवक व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कचरा प्रकल्प लवकरच नव्या जागेत हलवण्याच्या दृष्टीनेही चचार्च करण्यात आली. कचरा उडून जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत येऊ नये यासाठी तो बंदीस्त करण्याच्या सूचना सुर्वे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ व पानवल धरणापैकी पानवल धरणाला त्यांनी भेट दिली. याठिकाणी धरणाचे काम सुरु असून जानेवारी अखेर हे काम पूर्ण होणार असून जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाल्याचे ज्ञाती कंपनीच्या इंजिनिअरनी नगराध्यक्षांना सांगितले. या धरणातून पाणी ग्रॅव्हीटीने शहराजवळील नाचणे येथील जलशुध्दीकरण केंद्रात येते, त्याठिकाणाहून ते शहरात वितरीत करण्यात येते. त्यामुळे विजेचा खर्चही वाचत असतो. सध्या धरणाचे काम सुरु असल्याने पाणी नदी पात्रात थोडे पुढे अडवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जोशीनाल्यातून पुढे काजळीनदीला मिळणारे पाणी उचलून धरणात सोडण्याबाबतही विचार असून त्याबाबत पालकमंत्री ना. सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही नगराध्यक्षा सुर्वे यांनी स्पष्ट केले. यावेळी सोबत प्रशांत साळुंखे व दीपक पवार व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.












