साटेलीत विद्युतभारीत वीज वाहिनी तूटून पडल्याने म्हैस मृत्यूमुखी

 

सातार्डा I प्रतिनिधी : साटेली – भोमवाडी येथे सागरी महामार्गालगत असलेल्या वीज पोलावरील विद्युत भारीत वाहिनी तुटून म्हैशीच्या अंगावर पडल्याने म्हैस जागीच मृत्यूमुखी पडली. शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडली .साटेली – खालचीवाडी येथील शेतकरी रामा जगनाथ मांजरेकर यांच्या मालकीची ती म्हैस होती.

भोमवाडी येथून सातार्डा येथे सुरु असलेल्या विद्युत पुरवठ्या दरम्यान वीज पोलावरील विद्युत भारीत वहिनी तुटून त्याठिकाणी असलेल्या जुन्या वीज तारांवर पडून वीज पोलाखाली असलेल्या म्हैशीच्या अंगावर पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. म्हैस मृत्यूमुखी पडल्याची खबर शेतकरी रामा मांजरेकर यांनी सातार्डा पोलीस स्थानक, पशुधन अधिकारी व वीज महावितरण कंपनीला दिली.

यानंतर साटेली सरपंच श्रावणी नाईक, उपसरपंच बाबा कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य शैलेश नाईक, माजी उपसरपंच दादा शेंडेकर, दत्ताराम कळंगुटकर, गौरेश कोरगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सावळाराम पेडणेकर, पशुधन पर्यवेक्षक एल ए गावडे व पोलिसांना पाचारण केले.

यानंतर पशुधन पर्यवेक्षक एल ए गावडे, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सावळाराम पेडणेकर, पोलीस हवालदार गुरुनाथ नाईक, एस एन टाकेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

आणखी एक सांगाडा –

भोमवाडी येथे वीज प्रवाहित तार अंगावर पडल्याने शेतकरी रामा मांजरेकर यांच्या मालकीची म्हैस जागीच ठार झाली. मृत्यूमुखी पडलेल्या म्हैशीच्या बाजूला एका गुराचा सांगाडा आढळून आला आहे. साटेलीतून सातार्डा येथे सुरु असलेल्या विद्युत पोलांवरील वीज पुरवठा धोकादायक असल्याचा आरोप साटेलीचे माजी उपसरपंच दादा शेंडेकर यांनी केला आहे. विद्युत पोलांवरील जुन्या वीज तारा हटविण्याची मागणी श्री. शेंडेकर यांनी केली आहे.