सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलै पर्यंत रेड अलर्ट : प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची माहिती

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलै पर्यंत हवामान खात्यामार्फत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत ते जिल्हास्तरावरील यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. त्यासाठी तालुकावार तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली व्हाट्सअप ग्रुप निर्माण करण्यात आले असून यामार्फत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी सावंतवाडी येथे दिली.
सावंतवाडी उपविभागातील अधिकाऱ्यांची आपत्कालीन व्यवस्थेबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
सावंतवाडी तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी त्यांनी आपत्कालीन व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर ,तहसिलदार श्रीधर पाटील, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात शासकीय यंत्रणेने आवश्यक खबरदारी घेतली असून पूर परिस्थिती असलेल्या गावातील नागरिकांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. शासकीय यंत्रणा पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली नाही. मात्र, जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे काम तसेच पंचनामा करण्याचे काम सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भूस्खलन होणाऱ्या संभाव्य झोळंबे ,तुळस , सरंबळ, शिरशिंगे या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. तर भूस्खलन होणाऱ्या संभाव्य ठिकाणी शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ जुलै पर्यंत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.