ओझर विद्यामंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा पंचायत समिती मालवणचे माजी सभापती उदय परब यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक माजी मुख्याध्यापिका श्रीमती उषा द. मुरवणे व प्रमुख पाहुण्या माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा सं. पेडणेकर यांच्या उपस्थितीत नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अभय शेर्लेकर यांनी अहवाल वाचनाद्वारे ओझर विद्यामंदिरची वर्षभराची यशोगाथा मांडली. शाळेचे कलाशिक्षक एस. जे. सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘वर्षा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन श्रीमती उषा द. मुरवणे मॅडम यांच्याहस्ते झाले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते वर्षभरात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना अनेक दात्यांनी दिलेली रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शाळेसाठी विनामूल्य अध्यापनाची सेवा देत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी विजय नातू यांचा कांदळगाव येथील माता पालकांनी सत्कार केला. तसेच प्रशालेच्या वतीनेही विजय नातू व अल्प मानधनावर शाळेसाठी सेवा देत असलेल्या महिला शिक्षिका सुनयना पवार-कदम यांचाही सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्या सौ. शोभा सं. पेडणेकर यांनी आपल्या मनोगतातून ‘ओझर विद्यामंदिर पंचक्रोशीतील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश ओझर विद्यामंदिरमध्येच घ्यावा’ असे पालकांना आवाहन केले. कांदळगावचे सरपंच रणजीत परब, ओझर विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी तथा केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, माजी विद्यार्थी तथा उद्योजक उमेश कोदे यांनीही आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. तर अध्यक्षीय भाषणातून माजी सभापती उदय परब यांनी ओझर विद्यामंदिरच्या विकासासाठी आपण सर्वांनी मिळून साथ देऊया, असे सर्व ग्रामस्थांना आवाहन केले. पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी कांदळगावच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. शारदा मुळये, सौ. मधुरा परब, शालेय समिती सदस्य विजय कांबळी, श्रीराम परब, विजय शेलटकर, कांदळगाव पोलीस पाटील सौ. अक्षिता राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पालक सौ. अपर्णा पालव, सौ. संजना कुऱ्हाडे व कांदळगाव येथील माता पालकांनी अल्पोपाहाची सोय केली होती. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षक पांडुरंग राणे यांनी केले, तर सर्वांचे आभार स्नेहसंमेलनप्रमुख प्रवीण पारकर यांनी मानले.

पारितोषिक वितरणानंतर संध्याकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कराओके ट्रॅकवर गाणी सादर केली. पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक व रसिकजनांबरोबर माजी सभापती उदय परब व शालेय समिती सदस्य विशाल राणे यांनीही कार्यक्रमांचा आस्वाद घेतला. स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनासाठी स्नेहसंमेलन प्रमुख प्रवीण पारकर, शालेय सांस्कृतिक मंत्री अस्मी पारकर, लाजरी कांदळगावकर, मधुसूदन परुळेकर, प्रकाश खोडके, रविराज जाधव तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे लाजरी कांदळगावकर व तृप्ती परुळेकर यांनी दिमाखदारपद्धतीने सूत्रसंचालन करून रसिकजनांची मने जिंकली. स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शाळा प्रशासनाने सर्वांचे अभिनंदन केले.