खेड (प्रतिनिधी) – रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेड येथील विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड (आय.ई.ओ.) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 30 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. विज्ञान ऑलिंपियाड फाउंडेशनद्वारे 26 नोव्हेंबर 2025 रोजी घेतलेल्या प्रथम पातळीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यात रोटरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीसह आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा व व्याकरण कौशल्यांचा विकास साधण्यासाठी दरवर्षी ही परीक्षा आयोजित केली जाते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर सुवर्णपदकाची शिदोरी मिळवली आहे.
सुवर्णपदक पटकावलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पहिलीपासून अकरावीपर्यंतच्या एकूण 30 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यापैकी मोहम्मद पोत्रिक, स्वरा पवार, अन्वय भोई, रेयांश राऊत, स्पंदन गायकवाड, क्षिती शिंदे, सौम्या माणके, अहमद मुसा, रफान रावल, वरद टोंपे, शौर्या मोरे, शिव गवस, श्राव्या जोशी, समर्थ खडपेकर, शौर्य बनाफर, पूर्वी सिंग, अशर चौगुले, यामीन तांबे, साराह परकार, स्वप्निष्क गोस्वामी, सार्थक मोरे, जिया चव्हाण, सुमित भोसले, शौर्य गवस, त्रिवेणी गमरे, नील बारटक्के, श्राव्या निकम, निधी मालू, आस्था जाधव आणि इब्राहिम चौगुले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना शाळेत विशेष प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात येणार आहे.
यातील कु. सौम्या माणके, कु. शिव गवस, कु. श्राव्या जोशी, कु. यामीन तांबे, कु. सार्थक मोरे, कु. शौर्य गवस, कु. नील बारटक्के आणि कु. निधी मालू या आठ विद्यार्थ्यांची आय.ई.ओ.च्या द्वितीय पातळीच्या परीक्षेसाठी निवड झाली आहे.
या यशामागे शाळेतील सर्व इंग्रजी विषय शिक्षकांचे मेहनती मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या कष्टांचे आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे फळ म्हणून हे यश प्राप्त झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या या यशामुळे खेड शहरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.











