​रत्नागिरी पोलीस दलातर्फे ‘पोलीस स्थापना दिन’ व ‘रस्ता सुरक्षा अभियान’ उत्साहात साजरे

​रत्नागिरी:
महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘स्थापना दिन (रेजिंग डे)’ आणि ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान’ निमित्त रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज, ८ जानेवारी २०२६ रोजी पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील १२ विविध शाळांमधील सुमारे १,००० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात दिमाखदार ध्वज संचलन आणि पोलीस बँडच्या पथकाने सादर केलेल्या विविध धूननी झाली.
​यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस दलातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती देऊन त्यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. तसेच, क्यू.आर.टी. (Quick Response Team) पथकाने दहशतवाद विरोधी कारवाईचे चित्तथारक सादरीकरण केले. रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. याशिवाय, श्वान पथकाची प्रात्यक्षिके आणि तायक्वांदो प्रशिक्षक श्री. प्रशांत मकवाना यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले.
​या दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष आकर्षण म्हणून मिरकरवाडा जेटी येथील भगवती बंदर परिसरात ‘विशेष बोट रॅली’ काढण्यात आली. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला, ज्यामध्ये १५० मच्छीमार बांधव आपल्या बोटींसह सहभागी झाले होते.
​या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलीस दलाबाबत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि तरुणांमध्ये शिस्त व सुरक्षेबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.