… आणि त्यांच्या मदतीमुळे ‘त्या’ गरीब कुटुंबाचा शिधापत्रिकेचा प्रश्न मार्गी !

लांजा (प्रतिनिधी) शिधापत्रिका (रेशन कार्ड) मिळण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने लाभार्थी असताना देखील आणि प्रयत्न करूनही त्याबाबत लाभ मिळत नसल्याने हैराण झालेल्या लांजा कोत्रेवाडी येथील संपदा साळवी या गरीब कुटुंबाच्या मदतीला धावून जात त्यांना शिधापत्रिका मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे ते महसूल सहाय्यक म्हणून लांजा तहसील येथे काम करणारे विजय इंदवटकर यांनी.‌ याबाबत संपदा साळवी यांनी त्यांचे
विशेष आभार मानले .
समाजात आजही असे अनेक घटक आहेत, गोरगरीब कुटुंब आहेत जी शासकीय लाभांपासून वंचित राहतात.‌ शासकीय अनावस्थेमुळे , तेथील अधिकारी वर्गाच्या आडमुठ्या धोरणामुळे लाभार्थी असतानाही वंचित राहतात.या शासकीय सेवांचा लाभ त्यांना लाभ मिळत नाही. त्यांना अडचणी निर्माण होतात. अशाच प्रकारे लांजा कोत्रेवाडी येथील रहिवासी असलेल्या संपदा साळवी आणि सदानंद साळवी या गरीब कुटुंबाला रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळत नव्हते.‌ शिधापत्रिका मिळण्यास ते खऱ्या अर्थाने लाभार्थी म्हणून पात्र असतानाही त्यांना शिधापत्रिका मिळाली नव्हती.‌ सदानंद साळवी हे वय झाल्यामुळे घरीच असतात.‌ सर्व कुटुंबाचा डोलारा पत्नी म्हणून संपदा साळवी याच सांभाळतात.‌ रेशन कार्ड नसल्याने तांदूळ, गहू यासारख्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळत नव्हत्या.
ही बाब लांजा तहसील कार्यालय या ठिकाणी महसूल सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या कर्तव्यदक्ष विजय इंदवटकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः यात लक्ष घालून त्यांना शिधापत्रिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि अवघ्या पंधरा दिवसातच लागणारी सर्व आवश्यक ती कागदपत्रे, गोळा करून त्यांनी सदर शिधापत्रिका ही संपदा साळवी यांना उपलब्ध करून दिली.‌
अशाप्रकारे महसूल सहाय्यक विजय इंदवटकर यांच्यामुळे एका गरीब कुटुंबाचा
गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांच्या समाजाभिमुख कामाचे कौतुक केले जात आहे.