फोंडाघाट/कुमार नाडकर्णी — फोंडाघाट येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारत देशाने विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती करत आज जगात चौथ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक, शैक्षणिक व संरक्षण क्षेत्रात भारताची वाटचाल प्रेरणादायी आहे. “विकसित भारत @२०४७” या संकल्पनेनुसार भारताला विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभे करण्यासाठी, युवकांनी शिक्षण, नवोन्मेष, कर्तव्यनिष्ठा व राष्ट्रभक्तीच्या भावनेतून कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे,जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताने घटनात्मक मूल्ये, स्वातंत्र्य, समता व बंधुता जपणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमात NCC कॅडेट्सनी शिस्तबद्ध संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर करत “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












