विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशीची मागणी; शिवसेना नेते रामदास कदम यांचा केंद्र सरकारला इशारा

खेड (प्रतिनिधी) – राज्याचे जवळजवळ सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या ज्येष्ठ नेत्याच्या विमान अपघात प्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याची ठाम मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. अशा दर्जाच्या नेत्याचा अपघात होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या अपघाताचे चित्रण पाहिल्यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. सकाळी सुमारे आठ ते साडेआठच्या सुमारास घडलेल्या या घटनेत विमान खाली येताना तिरकस अवस्थेत दिसत होते. विमानतळाच्या दिशेने येताना ते सरळ रेषेत न येता कमानीसारख्या वाकड्या पद्धतीने येताना स्पष्टपणे दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही प्रत्यक्षदर्शींनी विमान धावपट्टीवर योग्य पद्धतीने उतरले नाही, असे सांगितले असून, तर काहींनी विमानाचा आवाजही वेगळा आणि असामान्य असल्याचे म्हटले आहे.
या सर्व बाबींमुळे पायलटला नेमकी कोणती अडचण आली होती, विमान खाली आल्यानंतर सरळ रेषेत का येऊ शकले नाही, तसेच कोणत्या तांत्रिक किंवा यांत्रिक कारणांमुळे हा अपघात झाला, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचे कदम यांनी ठामपणे सांगितले. अशा प्रकारच्या घटनांमुळे भविष्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर ज्येष्ठ नेते विमानाने प्रवास करण्यास कचरतील आणि विमान प्रवास असुरक्षित असल्याचा चुकीचा संदेश समाजात जाऊ शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.
हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असल्याने राज्य शासनानेही याची तातडीने दखल घ्यावी आणि दिल्लीतील केंद्र सरकारने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी आदेशित करावी, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. या चौकशीतून संपूर्ण सत्य बाहेर येणे आवश्यक असून, नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा विमान प्रवासावरील विश्वास अबाधित राहावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.