लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क; दोडामार्गच्या ‘नवरदेवा’ची सर्वत्र चर्चा

दोडामार्ग l सुहास देसाई :एकीकडे लग्नाची लगबग, पाहुण्यांची मांदियाळी आणि विवाहाचा शुभमुहूर्त जवळ आलेला असताना, दोडामार्ग तालुक्यातील पिकूळे येथील एका नवरदेवाने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य दिले. विवेक महालकर या नवरदेवाने लग्नमंडपात जाण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आणि एक ‘जबाबदार नागरिक’ असल्याचा परिचय दिला.

कर्तव्याची पहिली पायरी

आज विवेक यांचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. लग्नाचे विधी आणि घरातील लगबग बाजूला सारून, विवेक यांनी सकाळीच पिकूळे येथील मतदान केंद्रावर धाव घेतली. “मतदान करूनच नवा प्रवास सुरू… जबाबदार नागरिक, जबाबदार नवरदेव” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मतदान केल्यानंतरच त्यांनी लग्नमंडपाकडे प्रस्थान केले.

गावात कौतुकाचा वर्षाव

लोकशाहीच्या या उत्सवात नवरदेवाने दाखवलेला हा उत्साह पाहून मतदान केंद्रावरील अधिकारी आणि ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले. लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणीही मतदानाचे महत्त्व न विसरल्याबद्दल विवेक महालकर सध्या सोशल मीडियावर आणि तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

“मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य दोन्ही आहे. आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करताना देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडल्याचा मला सार्थ अभिमान आहे.”

— विवेक महालकर (नवरदेव)