वार्तापत्र कोकण संतोष वायंगणकर
निसर्गाच्या बदलामुळे संकटात सापडलेल्या आंबा, काजू आदी बागायतदार शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाईची अपेक्षा कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांची असली तर त्यात गैर काहीच नाही. कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. देवगडमध्ये आंबा बागायतदारही एकवटले आहेत. कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी संघटीत नसतानाही विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्यामुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला लावली. खा.नारायण राणे यांनी तेव्हा महाराष्ट्रातील इतर बागायतदार शेतकऱ्याला जर नुकसान भरपाई शासन देत असेल तर कोकणातील शेतकऱ्यालाही नुकसान भरपाई द्यावीच लागेल असे ठणकावत कोकणातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळू लागली.
कोकणाचे अर्थकारण हे आंबा, काजू, कोकम, मासळी यावर अवलंबून आहे. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये निसर्गातील बदलाचा परिणाम यावर होतो. आणि सारे अर्थचक्रच बिघडून जाते. एकिकडे आंबा, काजू च्या बाबतीत परराज्यातून येणारी फळ त्याचा परिणाम तर आहेच. आंबा आणि काजू यावर्षी बागायतदार शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देईल असे वाटले होते. एकतर नोव्हेंबर अखेरपर्यंत पावसाळा होता. यामुळे सहाजिकच नेहमी कोकणात पडणारी थंडीही लांबली. आता आंबा, काजूला मोहोर येणार असे वाटले होते. झालेही तसेच…आंबा, काजूच्या झाडांना भरपूर मोहोर आला. या भरपूर आलेला मोहोर पाहून आंबा, काजू बागायतदार सुखावला. परंतु परत एकदा निसर्गाचे चक्र फिरले. गेल्या पंधरा-वीस दिवसांत रात्रौच्यावेळी अगदी पहाटेसही गारपिटी प्रमाणेच दवबिंदूचा वर्षाव सतत वर्षाव होऊ लागला. या अचानक दवबिंदूच्या माऱ्याने चांगला आलेला मोहोर काळा पडू लागला… आंब्याच्या कणीचा सडा पडावा असा झाडाखाली पडला. काही भागामध्ये याचे प्रमाण फारच अधिक झाले. आणि सारेच गणित बिघडले. बागायतीत फवारणी करूनही त्याचा काही परिणाम होइनासा झाला. कोकणातील आंबा बागायतदारांचे हे म्हणणं आहे. या सगळ्यात आणखी भर म्हणून आंबा, काजू वर रोग पसरला. यासर्वातून मोहोराच्या रूपाने बागायतीतल भविष्यच अंधकारमय बनले. या निसर्गाच्या संकटाने कोकणातील शेतकरी बेजार झाला आहे.
गेली काहीवर्षे कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी या होणाऱ्या नुकसानीने हतबल झाला आहे. आंबा, काजूवर पडणारा रोग किंवा अन्य गोष्टींमुळे बागायतींचे जे नुकसान होते ते नुकसान रोखण्याचे शास्त्रीय स्तरावर कोणतेही प्रयत्न आजवर झालेले नाहीत. म्हणजे शेवटी हे सर्व निसर्गावरच अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कोणाचेच काही चालेनासे झाले आहे. आंबा, काजू व्यवसायात कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. परंतु दुर्दैवाने आंबा, काजू बागायतदार आजही संघटीत नाही. कोकणातील बागायतदार शेतकरी जेव्हा-जेव्हा संघटीत झाल्याचे दिसते त्या प्रत्येकवेळी त्याला एक राजकीय किनार असते. त्यामुळे सहाजिकच कोकणातील शेतकरी एकसंघतेने कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ आदी शेतीच्या प्रश्नांमध्ये एकवटलेला दिसायला हवा होता. परंतु दुर्दैवाने असे चित्र कुठे कधीच पहायला मिळालेले नाही. सत्तास्थानावर असणाऱ्यांना विरोधासाठी-विरोध करायचा असाच त्यामागचा हेतू असल्याचे आजवर तरी स्पष्ट झालेले आहे. यामुळे कोकणातील शेतकरी नेहमीच वैचारिकदृष्ट्या राजकीय पक्षामध्ये विभागलेला आहे हेच कोकणच दुर्दैव आहे. शासनस्तरावर कोणत्याही प्रश्नांचा पाठपुरावा करण्याची कोकणात मानसिकता नाही. विविध पक्षिय विचार असले तरीही पक्षिय राजकारण बाजूला ठेवून आंबा, काजू आणि शेती प्रश्नात होणाऱ्या नुकसानीबाबत संघटीत झालच पाहिजे त्याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. परंतु त्यातही अनेकांना राजकीय पोळी भाजायची असते. त्यामुळे विषय किती आणि कोणताही महत्वाचा असला तरीही त्याचे राजकारण करण्याची कार्यपद्धतीच सर्वार्थाने चुकीची आहे.
कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी, जांभुळ या शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या या महाराष्ट्रातील इतर भागातील शेतकऱ्यांपेक्षा फारच वेगळे आहेत. त्याची माहिती कोकणातील बागायतदार शेतकऱ्याला अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणी शेतकरी नेता येऊन कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी करणे आणि प्रश्न सोडवणे शक्य होणार नाही. कोकणातील बागायतींमध्ये राबणारे, कष्ट करणारे स्वत:च्या हातांनी, कष्टानी आपल्या मुलांप्रमाणे बागायती उभी करणारे, जोपासणारे अनेक बागायतदार शेतकरी आहेत. यामध्ये वर्षानुवर्षे बागायत करणारे वयोवृद्ध शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिले आहेत. हवामानातील बदल पाहिले आहेत. हवामानाच्या बदलाचे नेमकेपणाने परिणाम काय होणार त्याच नुकसान कस आणि किती होणार याची जाणीव त्यांना असते. परंतु दुर्दैवाने इतकी वर्षे संशोधन करतो असे भासवणाऱ्या यंत्रणेकडून मात्र अद्यापही शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन होत नाही. अलिकडे अनेकवेळा किटकनाशकांचा वापर करूनही त्याचा परिणामही दिसून येत नाही. हजारो रूपये आंबा, काजू बागायत वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु त्याचा अपेक्षित परिणाम शेतकऱ्याला दिसला नाही. की वारंवार किटकनाशकांची फवारणी करूनही बागायतदार शेतकऱ्याचे पैसे वाया जातात. एवढ मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असतानाही कोकणातील शेतकरी कधी शासनाने रडत बसत नाही. शेतकरी शासनाकडून अपेक्षाही धरत नाही. परंतु होत काय कोकण वगळता महाराष्ट्रातील इतर प्रांतातील शेतकऱ्यांना मात्र राज्यसरकारकडून गेल्या पन्नास वर्षात नुकसान भरपाईच्या नावाखाली पॅकेज दिले जाते. ऊस उत्पादक शेतकरी तर दरवर्षी नुकसान भरपाईचे लाभार्थी आहेत. दरवर्षी साखर उद्योगासाठी शेकडो कोटींच्या पॅकेजची लूट ही सुरूच आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी याचा लाभ उठवत आहेत. त्यामुळे निसर्गाच्या बदलामुळे संकटात सापडलेल्या आंबा, काजू आदी बागायतदार शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाईची अपेक्षा कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांची असली तर त्यात गैर काहीच नाही. कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना.नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. देवगडमध्ये आंबा बागायतदारही एकवटले आहेत. कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी संघटीत नसतानाही विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्यामुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला लावली. खा.नारायण राणे यांनी तेव्हा महाराष्ट्रातील इतर बागायतदार शेतकऱ्याला जर नुकसान भरपाई शासन देत असेल तर कोकणातील शेतकऱ्यालाही नुकसान भरपाई द्यावीच लागेल असे ठणकावत कोकणातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळू लागली. ही वास्तवताही यानिमित्ताने निदर्शनास आणणे आवश्यक आह. यावर्षी पाऊस, थंडी, रोगांचा प्रादुर्भाव पडणारे दवबिंदू , कोकणातील काही भागात पाऊसही पडतोय या सर्वांचा परिणाम कोकणातील बागायतींवर झाला आहे. यामुळे सहाजिकच कोकणातील शेतकरी आता होताला कसा ? या चितेंत आहेत.











