राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘माइंडमेझ’ या उपक्रमाचे आयोजन दि. २६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन हा भारतातील महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या ‘रमण परिणाम’ (Raman Effect) या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक स्पर्धांची ओळख करून देणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणे या उद्देशाने सायन्स क्लबची स्थापना मागील वर्षी करण्यात आली होती. “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. विद्यार्थ्यांकडे नाविन्यपूर्ण संकल्पना असल्यास त्या पुढे आणाव्यात; महाविद्यालय त्यांच्या संकल्पनांना संपूर्ण पाठबळ देईल,” असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी केले.
या उपक्रमांतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, इव्होल्युशन स्पर्धा, क्विझ स्पर्धा तसेच रुबिक्स क्यूब सॉल्व्हिंग स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी तसेच अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष (FE) आणि द्वितीय वर्ष (SE) विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, विश्लेषणात्मक विचारसरणी तसेच तांत्रिक कौशल्यांचा विकास साधण्याचा उद्देश आहे. सर्व स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व पदक प्रदान करण्यात येणार आहेत.
हा कार्यक्रम सायन्स क्लबतर्फे आयोजित करण्यात येत असून, महाविद्यालयाच्या सायन्स क्लब समन्वयक डॉ. शुभांगी माने यांच्या मार्गदर्शनाखाली सायन्स क्लब चे विद्यार्थी अध्यक्ष भार्गवी कवटकर, उपाध्यक्ष प्राची कदम आणि सचिव जिगीशा म्हापसेकर तसेच कामाक्षी केळूसकर व प्रथम वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक तथा खासदार नारायण राणे, अध्यक्षा सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष आमदार निलेश राणे तसेच सचिव व मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.












