विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज : डॉ. मंजिरी मोरे

वेंगुर्ले महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न…

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सह देशभरातून १३० संशोधक व विद्यार्थी यांचा सहभाग

वेंगुर्ले : दाजी नाईक
विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता व्यवसायाभिमुख ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुक्त व लवचिक अभ्यासक्रम रचना, शिक्षकांची बदललेली भूमिका आणि औपचारिक व उपयोगी शिक्षणपद्धतीचा प्रभावी समावेश हा राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा गाभा असल्याचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे यांनी सांगितले. तसेच बदललेले राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा शैक्षणिक संस्थांवर होणारा व्यापक परिणाम स्पष्ट करताना महाविद्यालयांनी गुणात्मक, कौशल्याधारित आणि अनुभवजन्य अभ्यासक्रमांची आखणी करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ या अत्यंत समकालीन आणि दूरदर्शी विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात पार पडला. या परिसंवादात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांसह देशभरातून १३० पेक्षा जास्त संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले होते, यामुळे परिसंवादाला राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठाचे स्वरूप प्राप्त झाले. बदलत्या शैक्षणिक परिप्रेक्ष्यात उच्च शिक्षण संस्थांची भूमिका, कौशल्याधारित शिक्षणाची गरज आणि विद्यार्थी-केंद्रित अभ्यासपद्धती या विषयांवर सखोल विचारमंथन या परिसंवादात झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. प्रा. जयकुमार देसाई व सौ. अंजली देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. परिसंवादाचे प्रास्ताविक संयोजक प्रा. डी. बी. राणे यांनी केले.

याप्रसंगी कोल्हापूरचे माजी नगरसेवक श्री अजितराव मोरे, प्रशासन अधिकारी श्री. पृथ्वीराज मोरे, सौ. ऋतुजा मोरे, श्री अजितसिंह मोहिते, सौ. सारिका मोहिते, पृथ्वी अजितसिंह मोहिते आणि प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी हे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच प्रोफेसर कविता लघाटे (डायरेक्टर, डब्ल्यू.आर.सी., आय.सी.एस.एस.आर.) व बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर श्री मिलिंद मगदूम यांनी शुभेच्छा दिल्या.

या परिसंवादास वेस्टर्न रिजनल सेंटर, आय.सी.एस.एस.आर., मुंबई व बँक ऑफ महाराष्ट्र यांचे सहकार्य लाभले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक श्री. एस. एच. माने हे देखील यावेळी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री पाटील यांनी केले, तर आभार प्रा. बी. एम. भैरट यांनी मानले.

प्रथम सत्राचे मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. संतोष पाटकर (सारस्वत कॉलेज, गोवा) उपस्थित होते. आपल्या बीज भाषणामध्ये त्यांनी ग्रामीण भारतातील उच्च शिक्षणाच्या अंमलबजावणीतील बदल आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाची भूमिका यावर सखोल विवेचन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थांनी नवोन्मेषी दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या सत्राचे चेअरमन प्रा. एस. एस. चमणकर होते. सत्राच्या शेवटी आभार डॉ. व्ही. एस. पाटोळे यांनी मानले.

द्वितीय सत्रामध्ये के. एन. नाईक कॉलेज, नाशिक च्या प्राध्यापिका सौ. रेखा जाधव मॅडम यांनी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील क्रेडिट सिस्टीम : विद्यार्थी केंद्रित शिक्षणाकडे एक पाऊल” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी क्रेडिट आधारित प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना विषय निवडीतील स्वातंत्र्य, शैक्षणिक लवचिकता आणि बहुआयामी शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध होतात, याचे विश्लेषण केले. या सत्रात डॉ. मुजुमदार मॅडम यांनी चेअर पर्सन म्हणून काम पाहिले.

संशोधन सादरीकरणाच्या सत्रामध्ये खर्डेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी वेदश्री चव्हाण व पार्थ कोळंबकर यांनी युवा गटातून आपले संशोधन पेपर सादर केले. तसेच प्राध्यापक वर्गातून डॉ. कबीर, डॉ. हॅन्ड्री डिसूजा व श्री प्रणव सावंत यांनी आपले शोधनिबंध मांडले. संशोधन सादरीकरणामुळे परिसंवादाला शैक्षणिक गांभीर्य लाभले. या सत्राचे आभार प्रदर्शन प्रा. पी. एस. प्रभू यांनी केले.

समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. संतोष पाटकर (सारस्वत कॉलेज, गोवा) उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी यांनी अत्यंत सखोल, चिंतनशील व प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी नमूद केले की, एन. ई. पी. 2020 हे भारताच्या शिक्षण व्यवस्थेला 21 व्या शतकाच्या गरजेनुसार सक्षम बनविणारे परिवर्तनशील धोरण आहे. जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वेगवान विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल क्रांती आणि बदलती रोजगारसंरचना या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर न बनवता त्यांना सक्षम, स्वावलंबी, नैतिकदृष्ट्या सजग आणि नवोन्मेषी नागरिक घडविणे हे शिक्षणसंस्थांचे प्रमुख कर्तव्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे बहुविषयक शिक्षणाला चालना मिळत असून विद्यार्थी आपल्या आवडीनुसार विषय निवडू शकतो, विविध शाखांतील ज्ञान एकत्रित करू शकतो आणि आपल्या करिअरचा मार्ग अधिक सक्षमपणे आखू शकतो. ‘एकात्मिक शिक्षण’ ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक ठरणारी आहे. संशोधनवृत्ती, चिकित्सक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि मूल्याधिष्ठित शिक्षण हे या धोरणाचे भक्कम स्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य गोस्वामी यांनी विशेषतः अधोरेखित केले की, शिक्षण केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता जीवनमूल्ये, सामाजिक बांधिलकी, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि राष्ट्रीय भावना जोपासणारे असावे. विद्यार्थी हा समाजपरिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे; त्यामुळे त्याच्यामध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नैतिकता विकसित होणे अत्यावश्यक आहे. एन. ई. पी. 2020 या माध्यमातून भारतीय शिक्षणपद्धतीला जागतिक दर्जा प्राप्त करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले.

शिक्षकांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून तो मार्गदर्शक, प्रेरणादाता आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा शिल्पकार आहे. नवीन धोरणानुसार अध्यापन पद्धतीत नवकल्पना, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, अनुभवाधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यांचा अवलंब करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञान नव्हे तर कौशल्य, मूल्ये आणि नवचेतना जागृत करणे हा एन. ई. पी. चा मूलभूत उद्देश असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.

या परिसंवादात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यांसह देशभरातून १३० पेक्षा जास्त संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले होते, यामुळे परिसंवादाला राष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठाचे स्वरूप प्राप्त झाले.

या परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट डॉ. बी. जी. गायकवाड व प्रा. पी. एस. प्रभू यांनी केले, तर समारोपाचे आभार प्रदर्शन डॉ. मनीषा मुजुमदार यांनी मानले.

परिसंवादाच्या निमित्ताने संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रंथालयातील दुर्मिळ हस्तलिखितांचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले होते. ग्रंथपाल प्रा. शुभदा माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

या राष्ट्रीय परिसंवादामुळे विद्यार्थ्यांना व संशोधकांना राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील बदल, संधी व आव्हाने याविषयी सखोल व उपयुक्त माहिती मिळाली. शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण करण्याच्या दिशेने खर्डेकर महाविद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरला.