‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्ष लागवड  

मिलाग्रीसच्या २०० विद्यार्थ्यांनी लावली झाडे

सावंतवाडी: सावंतवाडी येथील मिलाग्रीस प्रशालेने शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाला एका नाविन्यपूर्ण पद्धतीने पुढे नेले आहे. प्रशालेच्या हरित सेना विभागाने मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून तब्बल २०० विद्यार्थ्यांना विविध प्रजातींची रोपे वाटली. या विद्यार्थ्यांनी ती रोपे आपापल्या घरांच्या मोकळ्या जागांमध्ये लावून या उपक्रमाला यशस्वी केले आहे.

मिलाग्रीस प्रशाला आपल्या विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्ह्यात ओळखली जाते. याच परंपरेला कायम राखत, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, त्यांना प्रत्यक्ष वृक्षारोपणाचा अनुभव घेता आला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर, इंग्रजी प्रायमरी पर्यवेक्षिका श्रीम. क्लिटा परेरा, मराठी प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर कविता आणि कॉलेज इन्चार्ज श्रीम. शेहनीला राजगुरू यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, हरित सेना विभागाच्या शिक्षकांनीही या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे आणि प्रशालेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.