कलंबिस्त येथील अत्यंत धक्कादायक घटना
सावंतवाडी :
लग्न होत नसल्याच्या विवंचनेतून आणि मानसिक नैराश्यातून एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त-पास्ते वाडी येथे रविवारी घडली. लाडू शिवाजी पास्ते असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी लाडू पास्ते यांचे कुटुंबीय कामात व्यस्त होते. घरात कोणीही नसताना लाडू यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला आणि हॉलमधील वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यांची वहिनी कपडे धुवून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी लाडू यांना वारंवार हाका मारल्या, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, लाडू हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच त्यांचे बंधू दिनेश पास्ते व ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, हवालदार महेश जाधव आणि अनिल धुरी यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला व त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय आणि पुतणे असा परिवार आहे. नैराश्यातून टोकाचे पाऊल गेल्या काही दिवसांपासून लाडू पास्ते हे लग्न होत नसल्याच्या कारणावरून मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिक आरोग्याचा आणि सामाजिक प्रश्नांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.












