शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्यामुळे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय-आ. निलेश राणे

निवडणुका झाल्यावर विकासकामे व समाजहिताचा विचार करावा!

चिपळूण (प्रतिनिधी) :
राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आज मी पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झालो आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारीचा शब्द देऊन मालवण-कुडाळ मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मदत केली. त्यामुळेच मी दहा वर्षानंतर राज्याच्या सभागृहात आमदार म्हणून सक्रिय झालो आहे, अशा भावना शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केल्या.

चिपळुणात रविवारी राधाताई लाड सभागृहात हा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी समर्थकांसह आ. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. राणे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे आज मी आमदार झालो आहे. त्यांनी मला विधानसभेला संधी दिली. म्हणूनच मी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झालो आहे, असे आ. राणे यांनी यावेळी नमूद केले.

ते आणखी पुढे म्हणाले की, राजकारणात काम करीत असताना ते केवळ निवडणुकीपुरतेच ठेवावे. निवडणूक झाल्यावर विकासकामे व समाजहिताचा विचार करावा. अशी कामे करणारा राजकारणात नेहमीच यशस्वी होतो. जनतेला राजकारणाबद्दल काही देणेघेणे नसते. मात्र, त्यांची कामे झाल्यास निवडणुकीत तुमचा बूथ जरी नसला तरी जनता तुम्हाला मतदान करते. ही बाब कायम लक्षात ठेवून शिवसेनेतील जि. प., पं.स. व नगरपरिषदेत निवडून गेलेल्या उमेदवारांनी यापुढे आता जनतेच्या कामाचे व्हिजन ठेवावे. विकासाची एक निश्चित दिशा ठरवून त्यानुसार काम करावे, असे स्पष्ट केले.

चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण आहे. सांस्कृतीक, सामाजिक, क्रीडानगरी म्हणून ओळख आहे. त्यात अधिक विकासात्मक भर कशी पडेल याचा निवडून आलेल्यांनी विचार करावा. विकासासाठी प्रकल्प अहवाल, प्रस्ताव तयार करा. नगरविकास खात्याचे मंत्री आपले नेते आहेत. मीही सभागृहात आहे. त्याचा पाठपुरावा मी करीन. महामार्ग उड्डाण पुलासंदर्भात २०२५ मध्येच या पुलाची लांबी वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करून त्याबाबत अंदाजपत्रकासहीत पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो संबंधित विभागाकडे पाठवून झाला आहे. त्याला आता अंतिम स्वरूप येईल आणि प्रांत कार्यालयापासून पाग विश्रामगृहापर्यंत उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास चिपळूणवासीयांना आ. राणे यांनी यावेळी दिला.

मी कामकाजाची पद्धत बदलली आहे. पूर्वीच्या आणि आत्ताच्या पद्धतीत फरक आहे. जनतेच्या विकासकामे आणि हिताचा विचार करून मी काम करीत आहे. मात्र, माझी पूर्वीची कामाची पद्धत विसरलो नाही. जर कुणाला पूर्वीच्या कामाच्या पद्धतीची आठवण आली तर ती करून देण्याची आपली तयारी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंब ज्या पद्धतीने जनतेच्या हिताची कामे करीत आहे त्याच पद्धतीने येथेही काम होणे अपेक्षित आहे. पालकमंत्री सामंत यांचेदेखील आपल्याला नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळते.

यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य संदेश आयरे, विनोद झगडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती रश्मी गोखले, नगरसेवक निहार कोवळे, कपिल शिर्के, अंकुश आवले, नगरसेविका सौ. पल्लवी महाडिक, सौ. नीलम जाधव सौ हर्षाली पवार, माजी नगरसेवक परिमल भोसले, शिवसेना चिपळूण तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, रुपेश घाग, माजी नगरसेवक करामत मिठागरी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.