चाळीस वर्षानंतर तुटलेली नाळ पुन्हा जुळली
मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावर आजचा तो क्षण अनेकांसाठी केवळ एका फेरीबोटीचा शुभारंभ नव्हता, तर चाळीस वर्षांपूर्वी तुटलेली नाळ पुन्हा जुळण्याचा सोहळा होता. एम टू एमची फेरी जेव्हा विजयदुर्गच्या दिशेने रवाना झाली, तेव्हा किनाऱ्यावर उभ्या असंख्य डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. स्वप्न पुन्हा जागे झाले.
मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ झाला आणि गर्दीत उभ्या अनेकांच्या मनात जुन्या आठवणींची भरती आली. त्यातच प्रवीण घारकर आणि त्यांच्या नातेवाईक सुवर्णकला सुके. योगायोग असा की, चाळीस वर्षांपूर्वी विजयदुर्ग बंदरातून मुंबईकडे गेलेल्या कोकण बोटीच्या शेवटच्या फेरीचे घारकर प्रवासी होते. आणि आता, चाळीस वर्षांनी पुन्हा सुरू झालेल्या या नव्या फेरीचेही तेच पहिले प्रवासी ठरले.
प्रवीण घारकर यांनी आपल्या बोटीच्या प्रवासाबाबत प्रहारशी संवाद साधला , शब्द अडखळत होते. आनंद आणि आठवणींचा संगम त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. ते सांगतात, त्या काळात कोकण किनारपट्टीवर मोंगल लाईनच्या ‘कोकण शक्ती’ आणि ‘कोकण सेवक’ या दोन बोटी सेवा देत होत्या. १९८७ साली ती सेवा थांबली. शेवटची फेरी मुंबईकडे निघाली तेव्हा बोट जाईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. कॅप्टन आणि व्यवस्थापनातील वादामुळे वातावरण तणावपूर्ण होते. तरीही ती फेरी निघाली. आणि त्यानंतर ती बोट पुन्हा कधीच कोकण किनाऱ्यावर परतली नाही.
त्या जुन्या बोटींच्या आठवणी सांगताना ते म्हणतात, “त्या काळासाठी ती बोट योग्य होती. पण आजच्या काळात तशी बोट चालणार नाही.” प्रवाशांना स्वतःची अंथरुणे डेकवर टाकून झोपावे लागे. अनेकांना समुद्रात प्रवास करताना बोट हलत असे उलटी होई, त्याला बोट लागणे असे म्हणत असत प्रवाशांना झालेल्या उलटीचा वास संपूर्ण बोटीत पसरत असे. बोटीच्या कडेला गटारासारखी जागा होते ती तिथेच उलटी करावी लागे. गरीब प्रवाशांना नीट बसायलाही जागा नसे. वरच्या डेकवर गोव्याला जाणारे प्रवासी असत, पण ते तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते.
आता मात्र चित्र पूर्णपणे बदलले आहे. एम टू एम फेरी आधुनिक, स्वच्छ आणि सुसज्ज आहे. कमी वेळात प्रवास पूर्ण होत असल्याने रेल्वे आणि विमानाच्या तुलनेतही ही सेवा अनेकांसाठी परवडणारी ठरू शकते. विशेष म्हणजे वाहनांसह प्रवासाची सोय असल्याने सणासुदीला गावी येणाऱ्या कोकणवासीयांसाठी ही सेवा मोठा दिलासा आहे.
प्रवीण घारकर यांनी अपेक्षा व्यक्त केली की, ही फेरी कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरांपर्यंतही जावी. त्यांची आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सुके ताईंची भावना शब्दात मावणारी नव्हती., पूर्वी या बोटीतून कित्येक लग्नाची वरात निघत असे, नांदत्या लेकी याच बोटीतून सासरी आल्या, असे सांगताना त्यांचाही आवाज दाटून आला.
कोकणचा समुद्र हा इथल्या माणसाचा सखा आहे. आणि कोकण बोट ही केवळ प्रवासाची सोय नव्हती, तर कोकणी जीवनाचा अविभाज्य भाग होती. काळ बदलला, प्रवासाच्या सवयी बदलल्या, जगण्याच्या व्याख्या बदलल्या. पण त्या जुन्या आठवणींची बीजे अजूनही मनात जिवंत आहेत.
एम टू एम फेरी ही केवळ आधुनिक सेवा नाही; ती चाळीस वर्षांपूर्वी थांबलेल्या प्रवासाची नव्याने सुरू झालेली वाट आहे. कोकणी जनतेसाठी ही बोट म्हणजे त्यांच्या जगण्याची रक्तवाहिनीच. म्हणूनच आज या फेरीचे स्वागत केवळ टाळ्यांनी नाही, तर जिव्हाळ्याने आणि ओलावलेल्या डोळ्यांनी झाले.












