भंडारी समाज भवन उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य!

पालकामंत्री नितेश राणे यांची ग्वाही : जेष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्याचा केला विशेष गौरव

मालवण | प्रतिनिधी : भंडारी महासंघाच्या वतीने मालवण येथे भंडारी समाज भवन उभारण्याचा संकल्प ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या उपस्थितीत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला आहे. या भवनाच्या उभारणीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही नामदार नितेश राणे यांनी दिली आहे.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभास पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

नऊ वेळा आमदार म्हणून निवडून येऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा सत्कार सकल भंडारी हितवर्धक समाजाच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार कोळंबकर यांनी भंडारी समाज भवनासाठी पुढाकार घेण्याचे तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट केले होते.

यां अनुषंगाने बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, ज्येष्ठ आमदार आमचे मार्गदर्शक कालिदास कोळंबकर यांनी भंडारी समाज भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी भंडारी समाज भवनासाठी पालकमंत्री म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबरोबर जे काही सहकार्य लागेल ते करू अशी ग्वाही श्री. राणे यांनी केली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित भंडारी समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले.