दापोलीतील हर्णे बंदराला रो-रो सेवेचा थांबा द्यावा; राज्यमंत्री योगेश कदम यांची मागणी

मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू करण्यात आलेल्या सागरी रो-रो सेवेला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई–कोकण प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई ते विजयदुर्ग ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून सागरी मार्गाने प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांना मोठी सुविधा मिळत आहे. वाहनांसह प्रवास करण्याची सोय असल्याने वेळ आणि इंधनाचीही बचत होत आहे.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू असून भविष्यात येथे सागरी वाहतुकीची मोठी क्षमता निर्माण होणार आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिकांना मुंबईसह इतर शहरांकडे जाण्यासाठी रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेला हर्णे बंदर येथे थांबा मिळाल्यास दापोली तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
तसेच कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी मार्ग अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरेल. यामुळे स्थानिक स्तरावर व्यापार, पर्यटन आणि सागरी वाहतुकीलाही चालना मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवेला दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे थांबा देण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देण्यात यावेत, अशी ठाम मागणी राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.