हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानातुन शहरांच्या विकासाला मिळणार नवी दिशा

राज्यातील महानगर पालिका, नगर परिषद व नगरपंचायतींना ५३९ कोटी रूपयांचा निधी 
जिल्हयातील चार नगर परिषद व पाच नगर पंचायतींना प्रत्येकी एक कोटीचा निधी
नरेंद्र मोहिते | राजापूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त शासनाच्या नगर विकास विभागाने सुरू केलेल्या  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानातुन राज्यातील नगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायतींना ५३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अभियानातुन उपलब्ध झालेल्या या निधीतुन महानगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायतींना यांना विकास कामांच्या माध्यमातुन शहराच्या सर्वांगिण विकासाला गती देता येणार असून यातुन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
राज्यातील २९ महानगर पालिका व २९४ नगर परिषद व नगर पंचायतींना एवढया मोठया प्रमाणावर या अभियानांतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून रत्नागिरी जिल्हयातील चार नगर परिषद व पाच नगर पंचायतींना प्रत्येकी एक कोटी या प्रमाणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी ९ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतुन भविष्यात या नगर परिषद व नगर पंचायतींना वेगळया धर्तीवर विकास कामे करता येणार असल्याने शहरांच्या सर्वांगिण विकासात भर पडणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामाजिक, सांस्कृतिक व लोककल्याणाच्या क्षेत्रात दिलेले व्यापक योगदान विचारात घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नागरी स्थानिक संस्थांमध्ये सर्वांगीण नागरी विकास साधण्यासाठी नागरी लोककल्याण अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या अनुषंगाने नागरी स्थानिक संस्था क्षेत्रातील शाळांची विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृध्दी, आरोग्याच्या विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यात येत आहे. तसेच सदर अभियानांतर्गत विकसित करण्यात आलेल्या नागरी सुविधांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत प्रत्येक महानगरपालिकेस पाच कोटी तर नगरपरिषद/नगरपंचायत परिक्षेत्रात अधिसूचित नागरी सेवा व सुविधा पुरविणे  योजनेंतर्गत प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीस एक कोटी  निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक पातळीवर मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण रहाणार असून शासनाने नमुद केलेल्या अटी शर्ती प्रमाणेच या योजनेची कामे करता येणार आहेत. या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे अन्य कोणत्याही योजनेतून अथवा स्वः उत्पन्नातून होत नाहीत, कोणत्याही परिस्थितीत कामांची दुरुक्ती होणार नाही याची दक्षता जिल्हाधिकारी यांनी घ्यावयाची आहे. सदर प्रकल्पाअंतर्गतची कामे ही सार्वजनिक मालकीच्या ठिकाणीच करावीत, कामाचे स्वरुप सार्वजनिक असावे, तसेच त्यामुळे सर्वसमावेशक नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे याची दक्षता घ्यावयाची आहे. या योजनेंतर्गत कामे सबंधित शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत असणे बंधनकारक रहाणार आहे. सदरची कामे ही ई-निविदा पध्दतीनेच होणार आहेत.
या अभियानांतर्गत शासनाने निश्चित केलेल्या धोरणाप्रमाणे महानगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये असलेल्या शाळांची आणि त्यातही विशेषतः मराठी शाळांची गुणवत्ता वृध्दी, आरोग्याच्या विशेषतः महिला आरोग्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करणे, पर्यावरण व नागरी स्वच्छता, पर्यटन विकास तसेच नागरी स्थानिक संस्थांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी कामे होणार असल्याने नक्कीच याचा शहराच्या विकासाला फायदा होणार आहे. या अभियानांतर्गत या शाळा, आरोग्य, महिलांसाठी सुविधा अशा कामांना प्राधान्य असल्याने व याच साठी हा निधी खर्च करण्याचे बंधनकारक असल्याने यातुन चांगल्या सुविधा निर्माण होणार आहेत.
जिल्हयातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण व खेड या चार नगर परिषदांना या अभियानंतर्गत प्रत्येकी एक कोटी या प्रमाणे चार कोटी तर लांजा, देवरूख, गुहागर, दोपोली व मंडणगड या पाचा नगर पंचायतींनाही प्रत्येकी एक कोटी या प्रमाणे पाच कोटी असा जिल्हयात एकूण नऊ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी राज्यातील महानगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायती यांना एवढया मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याने नक्कीच या अभियानातुन या शहरांच्या विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्हयातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान राबविण्यासाठी सुयोग्य असे नियोजन करून याची अंमलबजावणी करावी व शहराबरोबरच जिल्हयाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन राज्याचे उदयोग, मराठी भाषा मंत्री व रत्नागिचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केले आहे.