जगदीश बंडोपंत पवार – ठोसर यांचा माहेर साहित्यरत्न पुरस्कार २०२६ ने गौरव!

जगदीश पवार-ठोसर यांना माहेर साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करताना ट्रस्टी शर्ली दीदी.

राजापूर (वार्ताहर): येथील वास्तुविशारद व लेखक जगदीश बंडोपंत पवार – ठोसर यांच्या ‘परिसर स्पर्श’ ह्या आत्मचरित्र पुस्तकाला आत्मचरित्र विषयात माहेर संस्था रत्नागिरी यांच्या वतीने माहेर साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कवी, लेखक यांच्या साहित्यकृतीला प्रोत्साहन देण्यासाठी माहेर संस्था रत्नागिरी मार्फत ‘माहेर साहित्यरत्न पुरस्कार २०२६’ आयोजित करण्यात आला होता. पुरस्कारासाठी जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२५ या पाच वर्षात प्रकाशित झालेली पुस्तके असणे अपेक्षित होते. स्वलिखित साहित्य प्रकारातील (मराठी, हिंदी, इंग्रजी) कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ललित लेखन, वैचारिक लेखसंग्रह इत्यादी साहित्याचा समावेश पुरस्कारासाठी करण्यात आला होता.

जगदीश बंडोपंत पवार – ठोसर यांच्या परिसर स्पर्श ह्या आत्मचरित्र पुस्तकाला आत्मचरित्र विषयात माहेर साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हातखंबा रत्नागिरी येथे माहेर संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार माहेर संस्था पुणे यांच्या ट्रस्टी शर्ली दीदी यांच्या हस्ते देण्यात आला.

कोकणी ग्रामीण खडतर जीवन, निसर्ग दिसायला सुंदर असला तरी जगणे अवघड करणारा असतो, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, समाजातील चाली रिती, परंपरा याचा घेतलेला अनुभव, अवतीभवतीच्या निसर्गासोबत वाढत असताना बनलेले सर्जनशील मन, त्यामुळे कलेची निर्माण झालेली ओढ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व त्याच समाजाचा भाग बनून जगणे हे सगळे सरळ साध्या शब्दात सांगितलेल्या आठवणी म्हणजे हे आत्मचरित्र आहे. कोकणी माणसाचं जगणं वागणं जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवे असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

जगदीश बंडोपंत पवार – ठोसर यांना माहेर साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.