खरोखरच यात्रेत वाघ येतो..

 

वनविभागाचाही दुजोरा 

शाहूवाडी l प्रतिनिधी :सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील उदगिरी (ता. शाहूवाडी) येथील काळम्मादेवी मंदिर परिसरात वाघ येत असल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी वन विभागाने मंदिर परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले होते. या कॅमेरांमध्ये वाघाचे स्पष्ट चित्रण झाल्याने मंदिर परिसरात वाघाचे आगमन होत असल्याची नोंद वन विभागालाही मिळाली आहे.

 

उदगिरी हे सह्याद्री व्याघ्र राखीवच्या बफर क्षेत्रातील एक महत्त्वाचे गाव असून निसर्गसंपन्न परिसरात वसलेले आहे. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या भागात अनेक वर्षांपासून मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व पाहायला मिळते. उदगिरी गाव काळम्मादेवीच्या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरामुळेही ओळखले जाते.

 

दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी येथे काळम्मादेवीची भव्य यात्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. यात्रेदरम्यान ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक विधींच्या वातावरणात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो.

 

यात्रेच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने वनक्षेत्राच्या सुरक्षेसाठी वन्यजीव विभाग विशेष दक्षता घेतो. वनवा होऊ नये, अवैध वृक्षतोड अथवा अवैध शिकार यांसारखे प्रकार घडू नयेत यासाठी अधिकारी व कर्मचारी तैनात केले जातात. गस्त पथके, ट्रॅप कॅमेरे आणि सतत निरीक्षण यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाते.

 

सन २०२४ आणि २०२५ मधील यात्रेदरम्यान मंदिर परिसरात ‘सेनापती’ या नर वाघाचे ताजे ठसे आढळून आले होते. वनकर्मचाऱ्यांनी त्याची नोंद घेतली होती. तसेच नुकत्याच पार पडलेल्या यात्रेदरम्यान कोयना अभयारण्य परिसरातील ‘बाजी’ या वाघाचे ट्रॅप कॅमेरामध्ये स्पष्ट चित्रण झाले आहे. त्यामुळे उदगिरी परिसरात वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

 

मानव आणि वाघ यांच्यातील संबंध अनेकदा संघर्षाचे ठरतात; मात्र उदगिरी परिसरात सहअस्तित्वाचे उदाहरण पाहायला मिळते. श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संवर्धन यांचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत असल्याचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.