खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील राजकारणात मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि खेडमधील ज्येष्ठ विधितज्ञ अॅड. आनंदराव भोसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे खेड तालुक्यातील राजकीय वर्तुळात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अॅड. आनंदराव भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, शिवसेना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष अॅड. सुधीर बुटाला, उद्योजक शैलेश शेठ कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्यासह अनेक वकील मंडळी आणि तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. आनंदराव भोसले हे खेड तालुक्यातील तिसंगी गावचे रहिवासी असून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य असून रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते.
भोसले हे तिसंगी पंचक्रोशी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष असून खेड येथील आयसीएस महाविद्यालयाचे चेअरमन म्हणूनही ते कार्यरत आहेत. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे परिसरात त्यांना विशेष मानाचे स्थान आहे.
शिवसेनेत प्रवेश करताना अॅड. आनंदराव भोसले यांनी शिवसेनेच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी भोसले यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा शिवसेनेला निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, अॅड. आनंदराव भोसले यांच्या या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला स्थानिक पातळीवर संघटनात्मक बळकटी मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.










